चेन्नईमधील ह्या मंदिरामध्ये भाविकांसाठी खास प्रसाद


मंदिरामध्ये दर्शनाला गेले की तीर्थ आणि प्रसाद घेऊनच भाविक परततात. अनेक मंदिरांमध्ये पेढे, शिरा, बुंदी, साखरफुटाणे असे निरनिराळे पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात. क्वचित ताजी फळे देखील प्रसाद म्हणून दिली जातात. पण प्रसादादाखल चक्क बर्गर आणि सँडविच दिले जाणारे मंदिर आपल्या कल्पने पलीकडचे आहे, नाही का? पण असे मंदिर अस्तित्वात आहे, जिथे सँडविच आणि बर्गर देवाचा प्रसाद म्हणून दिले जातात, आणि भाविक पूर्ण भक्तिभावाने ह्या प्रसादाचा स्वीकार करतात.

मंदिरातील देवाचा प्रसाद कोणताही असो, तो देवाचा आशिर्वाद समजून भक्तिभावाने, आनंदाने ग्रहण केला जावा हे योग्यच आहे. पण अलीकडच्या काळामध्ये लोकप्रिय असलेले पदार्थ आता मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळू लागल्याने भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथे असलेल्या ‘जय दुर्गा पीठम् ‘ नामक मंदिरामध्ये भाविकांना प्रसाद म्हणून बर्गर, ब्राउनी, सँडविचेस आणि चेरी टोमॅटो सॅलड हे पदार्थ दिले जातात.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्ताप्रमाणे, ह्या मंदिराची स्थापना करणारे गृहस्थ ‘ हर्बल ऑन्कोलॉजिस्ट ‘ के श्रीधर यांनी स्वतः मंदिरामध्ये दिल्या जाणाऱ्या आगळ्या वेगळ्या प्रसादाबद्दल माहिती दिली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये केवळ आदरभाव, भक्ती, प्रेम याच भावना असतात. त्या भावनेने मंदिरामध्ये दिलेला प्रसाद कोणत्या ही रुपात असला, तरी तो देवाचा आशिर्वादच असल्याचे श्रीधर यांचे मत आहे. ह्या मंदिरामध्ये मिळणारा आगळा वेगळा प्रसाद लोकप्रिय होत असून, हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद खास तर आहेच, त्याशिवाय हे सर्व पदार्थ FSSAI द्वारा प्रमाणित केलेले आहेत. तसेच प्रसादाच्या पॅकेट वर त्याची एक्सपायरी डेट ही लिहिलेली असते. प्रसाद वितरणासाठी मंदिरामध्ये ‘व्हेंडिंग मशीन्स ‘ ठेवण्यात आली आहेत. भाविकांनी त्यांनी मिळालेले टोकन व्हेंडिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर प्रसादाचा बंद डबा मशीनद्वारे दिला जातो. इतकेच नाही, तर एखाद्या भाविकाचा वाढदिवस असल्यास त्याला केक प्रसाद म्हणून दिला जातो. आयुष्यामध्ये प्रथमच असा आगळा वेगळा प्रसाद मिळत असल्याने भाविक आश्चर्यचकित होत आहेत, आणि त्याच बरोबर आनंदी देखील दिसत आहेत.

Leave a Comment