नकदीचा खडखडाट – बँक संघटनांचा आंदोलनाचा इशारा


देशातील अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये नकदी पैशांचा खडखडाट निर्माण झालेला असतानाच या तुटवड्याबद्दल बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दोष दिला आहे. या खडखडाटाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) या संघटनेचे सरचिटणीस वेंकटाचलम यांनी गुरुवारी हा इशारा दिला. “रिझर्व बॅंकेच्या कोरड्या निवेदनाने काहीही होणार नाही. चलनी नोटांचा पुरवठा सुधारण्यासाठी ठोस आणि त्वरित पावले उचलण्याची गरज आहे,” असे वेंकटाचलम म्हणाले.

गेल्या काही आठवड्यांपासून अनेक राज्यातील एटीएममध्ये नोटांचा तुटवडा जाणवत आहे. खासकरून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि सध्या विधानसभा निवडणूक होत असलेल्या कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर एटीएम बंद आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बँक कर्मचाऱ्यांचा दोष नसताना ग्राहक त्यांच्यावर ओरडत असून त्यांना शिवीगाळ करत आहेत, असे वेंकटाचलम म्हणाले.

या संकटाबद्दल रिझर्व बॅंकेला दोष देताना ते म्हणाले की नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा छापायला सुरुवात केली तेव्हापासून खरी समस्या सुरू झाली. “नोटांच्या या टंचाईमुळे जनतेच्या मनात भय निर्माण झाले असून हे भय दूर करणे ही रिझर्व बॅंकेचे आणि सरकारची जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.

Leave a Comment