रिझर्व्ह बँकेने वाढवला रोख रकमेचा पुरवठा


नवी दिल्ली: आता अनेक आघाड्यांवर देशात निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून एकीकडे रोख रकमेचा साठा करणाऱ्यांवर कर यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे रोख रकमेचा पुरवठा रिझर्व्ह बँकेने वाढवला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशात ३० ते ३५ ठिकाणी बुधवारी छापे टाकण्यात आले आहेत. तर बिहारमधील एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून ८०० ते ९०० कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील रोकड टंचाईची समस्या मोठी असून येथील मोठ्या कंत्राटदारांची भूमिका संशयास्पद असल्याने अनेकांची कर यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत छापेमारीतून मोठी रोख रक्कम हाती लागलेली नाही. पण कर यंत्रणांकडून येणाऱ्या दिवसांमध्ये कारवाईला व्यापक रुप देण्यात येणार आहे. दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी हे देशाच्या अनेक भागांमधील चलन टंचाईमागे प्रमुख कारण असल्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड काढणारे आता यंत्रणांच्या रडारवर असणार आहेत. संशयाच्या भोवऱ्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील कंत्राटदारांचे व्यवहारदेखील असल्यामुळेच या व्यवहारांचा तपासदेखील संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे. या दोन्ही राज्यांमधील अनेक मोठे कंत्राटदार लहान कंत्राटदारांना धनादेश देत आहेत. प्रकल्पांच्या नावाखाली हे धनादेश दिले जात असून त्याच्या आधारे लहान कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली जात आहे.

Leave a Comment