५ पेक्षा जास्तवेळा एटीएममधून पैसे काढणे महागणार


मुंबई: देशभरातील एटीएममधील चलन कल्लोळ बंद होतो ना होतो, तोच बँका ग्राहकांना आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत. एटीएममधून ५ पेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला २० रुपये चार्ज आता द्यावा लागेल. हा चार्ज सध्या १५ रुपये आहे.

एटीएम ट्रान्झॅक्शनसाठीचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने आणखी कडक केले असल्यामुळे एटीएम ऑपरेटर्सनी ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवण्याची मागणी केली आहे. खर्च वसूल व्हावा, यासाठी एटीएम ट्रान्झॅक्शनमध्ये ३-५ रुपयांची वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आरबीआयने नवे नियम जुलैपर्यंत लागू करा, असे निर्देश बँकांना दिले आहेत. आरबीआयने कॅशव्हॅनसाठी केलेल्या नियमानुसार, कॅश मॅनेजमेंट कंपन्यांकडे कमीत कमी ३०० कॅश व्हॅन, प्रत्येक कॅश व्हॅनमध्ये एक ड्रायव्हर, दोन बंदुकधारी आणि दोन कर्मचारी असावेत.

त्याचबरोबर प्रत्येक गाडीत जीपीएस, भू मॅपिंग, जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता असायला हवे. तसेच ज्याने एटीएमबाबत प्रशिक्षण घेतले आहे, तीच व्यक्ती एटीएममध्ये पैसे भरणे, एटीएम हाताळण्याचे काम करेल. बँकांना हा सर्व खर्च न परवडणारा असल्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात १९कंपन्यांकडे एटीएम कॅश मॅनेजमेंटचे काम आहे. हा सर्व भार या कंपन्यांना सोसावा लागतो. त्या कंपन्या बँकांकडून तो वसुल करतात. परिणामी बँका तो चार्ज ग्राहकांवर लादतात.

Leave a Comment