शुद्ध सोने कसे ओळखाल?


केवळ शुभ मुहुर्तांवरच नाही, तर अनेक सणांच्या निमित्ताने, किंवा घरी काही समारंभ असल्यास सोने खरेदी अवश्य केली जाते. वर्षातील काही वर्ज्य दिवस सोडल्यास एरव्ही बाराही महीने सोने खरेदी केले जात असते. त्यातून बाजारामध्ये नित्य नव्या स्टाईलची डिझाईन्स येत असतात. विशेषतः लग्नसराईच्या दिवसांमध्ये तर सोने खरेदी हा मोठा महत्वाचा प्रसंग असतो. पण सोने खरेदी करताना ते अस्सल किंवा चोख आहे किंवा नाही ह्याची माहिती सर्व सामान्यांना फारशी नसते. त्यामुळे सोने खरेदी करताना दुकानदारावर विश्वास ठेऊनच ते खरेदी केले जात असते.

आपण खरेदी करीत असलेल्या सोन्याच्या जिन्नसावर जरी ते खात्रीचे असल्याची मोहोर लावून ( हॉलमार्क ) ग्राहकांची फसवणूक होऊ नये याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी काही ग्राहक थोडे पैसे वाचविण्यासाठी सोनारावर विश्वास ठेऊन ‘अनमार्क्ड’ सोने खरेदी करताना दिसतात. अश्या रीतीने फसवणूक करून, चोख नसलेले सोने ग्राहकंना विकले असल्याचे अनेक किस्से आपण पाहत, ऐकत असतो. म्हणूनच आपण खरेदी करीत असलेले सोने चोख आहे किंवा नाही याची पारख आपल्यालाही करता येणे आवश्यक आहे.

सोने अस्सल आहे किंवा नाही हे पारखून पाहण्याकरिता चुंबक वापरून एक अगदी सोपी चाचणी करून पाहता येईल. जर घरी चुंबक नसेल, तर कोणत्याही हार्ड वेअरच्या दुकानामध्ये चुंबक सहज मिळू शकेल. हे चुंबक सोन्यावर लावून पाहावे. जर हे चुंबक सोन्याला चिकटले तर ते चोख नाही असे समजावे. सोने चोख, अस्सल असेल, तर चुंबक त्याला चिकटणार नाही.

एक सिरॅमिकची प्लेट घ्यावी. ह्या प्लेटवर सोने घासून पाहावे. जर प्लेट वर काळे डाग आले, तर सोने अस्सल नाही असे समजावे, आणि जर प्लेटवर हलके सोनेरी रंगाचे डाग आले, तर सोने चोख आहे असे समजावे. सोने चोख आहे किंवा नाही, हे पाहण्याचा आणखी एक अतिशय सोपा उपाय आहे. ह्यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये पाणी भरून घ्यावे. आणि सोने त्या पाण्यामध्ये टाकावे. जर पाण्यात टाकलेले सोने पाण्यावर तरंगू लागले, तर ते अस्सल नाही असे समजावे. जर पाण्यामध्ये टाकलेले सोने भांड्याच्या तळाशी जाऊन बसले, तर ते अस्सल आहे असे समजावे.

त्याचप्रमाणे सोने काही सेकंद दाताखाली धरावे. जर सोने अस्सल असेल, तर त्याच्या खुणा दातांवर दिसून येतील. मात्र हा उपाय अतिशय सांभाळून करावा. चोख सोने अतिशय मऊ असते. जर दातांचा दागिन्यावर जास्त दबाव पडला तर दागिना तुटू शकतो किंवा त्यावर दातांच्या खुणा येऊ शकतात.