दातदुखी कमी करण्यासाठी अवलंबा हे उपाय


दातदुखीचा त्रास हा अतिशय हैराण करणारा असतो. एकदा दातदुखी सुरु झाली, की ती दुसरे तिसरे काही सुचू देत नाही. दात दुखायला लागला, की खाणे पिणे कमी होते, आणि दुखऱ्या दातामुळे हिरडी आणि परिणामी चेहरा देखील सुजल्यासारखा दिसू लागतो. शरीरामध्ये इतर कुठेही दुखले खुपले तरी त्या वेदनांपेक्षा दाताचे दुखणे जास्त त्रासदायक असते. ह्यावर स्वतःच्या मनाने काहीतरी उपचार करणे धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने, दातदुखी सुरु झाली की डॉक्टरांकडे धाव घेण्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय नसतो. पण जर त्वरित डॉक्टरांकडे जाणे शक्य नसेल, तर दात दुखी कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करता येऊ शकेल.

दात दुखी कमी करण्यासाठी पेरूच्या झाडाची कोवळी पाने धुवून, जो दात दुखतो आहे, तिथून चावावीत. ही पाने काही वेळ चावून मग थुंकून टाकावीत. जर पाने चावून थुंकणे शक्य नसेल, तर ही पाने थोड्या पाण्यामध्ये उकळून घ्यावीत आणि ह्या पाण्याने खुळखुळून चुळा भराव्यात. ह्या उपायाने दात दुखी पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. तसेच कांद्याचा एक लहानसा तुकडा दुखऱ्या दातावर ठेऊन तो अधून मधून चावावा. कांद्यामध्ये अँटी सेप्टिक गुण असल्याने दाताचे दुखणे पुष्कळ प्रमाणात कमी होते. जर कांद्याचा तुकडा तोंडात धरायचा नसेल, तर कांद्याच्या रसामध्ये कापसाचा लहान बोळा भिजवून तो बोळा दुखऱ्या दातावर ठेवावा.

कांद्याच्या तुकड्याप्रमाणेच लसणाच्या पाकळीचा देखील उपयोग होऊ शकतो. त्यासाठी लसणीची एक लहान पाकळी दुखऱ्या दाताखाली धरून हलके हलके चावावी. ह्या उपायाने दहा ते पंधरा मिनिटांतच दाताचे दुखणे कमी झाल्याचे जाणवेल. तसेच काळी मिरी आणि मीठ यांच्या वापराने देखील दातदुखी कमी होण्यास मदत मिळेल. ह्या उपायाने थोडी आग झाल्याची भावना होईल, पण दाताचे दुखणे नक्कीच कमी होईल. ह्यासाठी थोडेसे मीठ, आणि याच्या अर्ध्या प्रमाणात काळी मिरी पूड घेऊन ह्यामध्ये दोन तीन थेंब पाणी घालावे. ही पेस्ट दुखऱ्या दातावर लावावी. दात जर किडल्यामुळे दुखत असेल, तर हा उपाय नक्की कामी येईल.

‘व्हीटग्रास’ किंवा गव्हाचे लहानसे रोप खरेतर सहजी मिळत नाही. पण जर मिळालेच, तर ह्या रोपाची पाने किंवा गवत पाण्यामध्ये उकळून घेऊन त्या पाण्याने चुळा भरल्यासही दातदुखी कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment