कांद्याच्या सालांचा असाही फायदा


भाजी आमटीसाठी किंवा इतर कुठला पदार्थ करण्यासाठी कांदा चिरला, की त्याची साले टाकूनच दिली जातात. आता एकदा कांदा सोलला, की त्याच्या सालींचे काय काम? पण कदाचित आपल्याला ठाऊक नसेल, की कांद्याप्रमाणेच कांद्याची साले देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहेत. आहारतज्ञांच्या मते, कांद्याच्या सालींमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहेत. त्यामुळे कांद्याची साले फेकून देण्याऐवजी सूप बनविताना त्यांचा वापर केला जाऊ शकतो. सूप बनविताना कांद्यांची साले त्यामध्ये घाला, आणि त्यानंतर सूप गाळून घेऊन कांद्याची साले वेगळी करून घ्या.

कधी हवामानातील बदलामुळे किंवा खूप थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे घसा खवखवतो, दुखू लागतो. अश्या वेळी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण केवळ गरम पाणी पिण्याऐवजी त्या पाण्यामध्ये कांद्याची साले घालुन घेऊन, ते पाणी उकळून, त्या पाण्याने गुळण्या केल्या असता घशामध्ये होणारी खवखव थांबते. कांद्याच्या सालीमध्ये फ्लावेनॉल्स असतात, जी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सहायक आहेत. जर उच्चरक्तादाबाची समस्या असेल, तर सूप्स मध्ये कांद्याची साले उकळून त्याचे सेवन करण्याच्या सवयीचा अवलंब करावा.

कांद्याची साले, घरामध्ये शिरणारे डास किंवा लहान कीटक पळविण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. ज्याप्रमाणे फिनाईल किटाणूंचा प्रादुर्भाव न व्हावा त्यासाठी ‘डीसइन्फेक्टन्ट’ म्हणून काम करते, तोच उपयोग कांद्याच्या सालांचा आहे. ह्याचा वापर करण्याकरिता कांद्याची साले रात्रभर थोड्या पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी लहान बाउल्स मध्ये भरून, जिथून डास घरामध्ये शिरू शकतात, अश्या दरवाजे आणि खिडक्यांच्या जवळ ठेवावे. ह्या पाण्याचा वास फार उग्र असल्याने कीटक आणि डास घरामधे प्रवेश करू शकणार नाहीत. विशेषतः डेंग्यू फैलावणाऱ्या डासांना पळविण्याकरिता हा उपाय अतिशय उपयोगी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही