ह्या मंदिरामध्ये महिलांप्रमाणे पुरुषांना देखील ड्रेस कोड !


भारतामध्ये अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्यास बंदी असल्याचे किंवा महिलांसाठी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी विशिष्ट ड्रेस कोड असल्याची माहिती आपल्या कानी पडत असते. पण बेंगळूरू येथील एका मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांना देखील विशिष्ट ‘ड्रेस कोड’ चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ह्या ड्रेस कोडचे पालन केल्याशिवाय ह्या मंदिरामध्ये पूजा किंवा दर्शनच काय, तर प्रवेश करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

बेंगळूरू येथील राजराजेश्वरी मंदिरामध्ये दर्शनाला जाण्यासाठी महिला आणि पुरुष, दोघांनाही मंदिराच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. येथे भेट देऊन दर्शन घेणाऱ्या पर्यटकांच्या माहितीसाठी, येथे पाळल्या जाणाऱ्या ड्रेस कोडची माहिती देणारे विशेष फलक मंदिराच्या बाहेर लावण्यात आले आहेत, जेणेकरून प्रथमच ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, मंदिराच्या नियमांची पूर्वकल्पना दिली जावी. ह्या फलकांवर पुरुषांनी आणि महिलांनी पाळावयाच्या नियमांची माहिती दिली गेली आहे.

ह्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पालन करण्याच्या नियमावलीनुसार कोणत्याही पुरुषाला येथे जीन्स घालुन प्रवेश करणे मना आहे. पुरुषांनी केवळ कापडापासून बनविलेली पँट किंवा सोवळे ( धोतर ) नेसून ह्या मंदिरामध्ये प्रवेश करणे बंधनकारक आहे. तसेच महिलांनी देखील केस मोकळे सोडून मंदिरामध्ये प्रवेश करणे मना आहे. त्याचप्रमाणे महिलांनी केसांची ‘पोनीटेल’ घालणे देखील मना आहे. केसांची वेणी किंवा अंबाडा असणे येथे बंधनकारक आहे, तसेच महिलांनी जीन्स, टी शर्ट किंवा बिनबाह्यांचे कपडे, स्कर्ट इत्यादी घालुन मंदिरामध्ये प्रवेश करण्याला मनाई आहे.

केवळ महिलांनीच नाही, तर लहान मुलींनी देखील महिलांसाठी असलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर लहान मुली स्कर्ट किंवा फ्रॉक घालुन येणार असतील, तर त्यांच्या पोशाखाची लांबी अगदी पायापर्यंत असणे आवश्यक आहे. महिलांनी साडीमध्ये, किंवा सलवार कुर्ता असेल, तर त्यावर दुपट्टा घेऊनच मंदिरामध्ये प्रवेश करावा असा ह्या मंदिराचा दंडक आहे. आपले पारंपारिक पोशाख लक्षात घेऊन ही नियमावली लागू केली असल्याचे मंदिराच्या वतीने सांगितले गेले असल्याचे समजते.

Leave a Comment