माठाच्या पाण्याची चवच निराळी


उन्हाळ्याची चाहूल लागताच गरमागरम चहा किंवा कॉफी सोडून थंडगार सरबत, उसाचा रस, फळांचे रस, मिल्कशेक्स, आईसक्रीम्स असे एक ना अनेक पदार्थ हवेहवेसे वाटू लागतात. एरव्ही घरामध्ये किचनमध्ये ओट्यावर असणाऱ्या प्यायच्या पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये जाऊन बसतात. तापलेल्या उन्हातून घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये शिरले की सगळ्यात आधी थंड पाणी पिऊन आपण आपली तहान शमवित असतो. पण फ्रीजमधल्या गार पाण्याने तहान शमल्यासारखे वाटत नाही. या उलट माठामध्ये थंड झालेल्या पाण्याची चवच आगळी असते. त्याशिवाय माठामध्ये थंड केलेले पाणी आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे.

शरीरामध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी वाढविण्यास सहायक असण्यापासून ते पित्त शमविण्यापर्यंत, माठातील थंड पाण्याचे अनेक उपयोग आहेत. पाण्यामध्ये ज्या अशुद्धी असतील त्या शोषून घेण्याचे काम मातीचा माठ करीत असतो. त्याचप्रमाणे पाण्यामधे आरोग्यासाठी आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे देण्याचे काम ही मातीचा माठ करीत असतो. तसेच माठातील पाणी अवाजवी थंड ही नसते किंवा गरमही नसते.

माठामध्ये थंड केलेल्या पाण्याच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवलेले पाणी पिण्याऐवजी माठामध्ये भरून ठेवलेले पाणी आरोग्यासाठी जास्त चांगले आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ठेवल्याने काही काळाने त्या प्लास्टिक मधील अशुद्धी पाण्यामध्ये उतरू लागतात. तसेच माठातील पाण्याच्या सेवनाने शरीरातील टेस्टोस्टेरोनची पातळी वाढते. माठ मातीचा बनला असल्याने त्यामध्ये अल्कलाईन तत्वे असतात. ही तत्वे शरीराची पीएच लेव्हल संतुलित राखण्यास सहायक आहेत. माठातील पाण्याचे सेवन केल्याने पित्त शमते. तसेच अॅसिडीटीमुळे होणारी पोटदुखी किंवा जळजळ ह्या पाण्याच्या सेवनाने कमी होते.

फ्रीजमधील थंड पाणी अति प्रमाणात प्यायल्यास घसा खराब होऊ शकतो, तसेच शरीरावर हलकी सूज दिसून येऊ शकते. फ्रीजमधील थंड पाण्यामुळे घशातील कोशिकांचे तापमान अचानक कमी होऊन घसादुखी सुरु होते, घशाला सूजही येऊ शकते. पण माठातील पाणी अवाजवी थंड होत नसल्याने घशासाठी अपायकारक नाही, आणि तहान लवकर भागविणारे आहे. माठीतील पाणी फारसे थंड नसल्याने शरीरामध्ये वात उत्पन्न होऊ देत नाही. तसेच गेरू रंगाचा माठ हा उन्हाळ्यामध्ये पाण्याला शीतलता प्रदान करणारा असल्याने त्याच रंगाचा माठ शक्यतो खरेदी करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment