झोपताना उशी घेणे ठरु शकते अपायकारक


दिवसभराची धावपळ संपत आली, की आरामदायक बिछाना डोळ्यांसमोर दिसू लागतो. उशीवर डोके टेकताच गाढ, आरामदायक झोप लागावी अशी आपली अपेक्षा असते. मात्र, आपण झोपताना ज्या उशीचा वापर करतो, ती उशी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक तर नाही, ह्याचा विचार करणे अगत्याचे आहे. एका रिसर्चनुसार झोपताना डोक्याखाली जास्त जाड उशी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जर उशी जास्त जाड असली, तर मान अवघडणे, पाठ दुखणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. ह्या तक्रारींमुळे रात्रभर शांत झोप लागत नाही. त्यामुळे पुढच्या दिवशी शरीर ताजेतवाने होण्याऐवजी सुस्तावलेले, निरुत्साही असते.

तज्ञांच्या मतानुसार जाड उशीवर झोपल्याने चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसेच त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. डॉक्टर आर्थर टकर यांनी केलेल्या एका रिसर्चनुसार आपण झोपण्यासाठी वापरत असलेल्या उशीमधे अनेक किटाणू, त्वचेवरील मृत पेशी, धूळ, इत्यादी साठत असतात. उशीवर स्वछ धुतलेला नवीन अभ्र चढविला, की उशी साफ झाली हा एक मोठा गैरसमज असल्याचे डॉक्टर टकर म्हणतात. पण असे नसून उशीवरील किटाणू, धूळ, मृत पेशी यांच्यामुळे त्वचेशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. तसेच जास्त जाड उशीच्या वापराने मान आणि पाठीच्या स्नायूंवर जास्त ताण पडत असतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

झोपण्यासाठी उशी निवडताना पातळ उशी निवडावी. तसेच ज्या कपड्यापासून ती उशी तयार केली गेली आहे, त्याची, किंवा त्याच्या रंगाची आपल्याला अॅलर्जी तर नाही, हे पाहणे देखील आवश्यक असते. खरे तर झोपताना उशी शक्यतो न वापरण्याचा सल्लाच तज्ञ देतात. पण जर उशी वापरायचीच असेलं तर एखाद्या मऊ साडीची घडी किंवा तत्सम कपड्याची आणि तितक्याच उंचीची उशी डोक्याखाली घ्यावी. आजकाल बाजारामध्ये धुता येतील अश्या मटेरियलच्या उश्या उपलब्ध आहेत. शक्यतो त्या उशांचा वापर करावा. उशी जास्त कडक किंवा अगदीच मऊ नसावी. दर महिन्यामध्ये एकदा गाद्या आणि उश्या उन्हामध्ये वाळवाव्यात, किंवा ते शक्य नसल्यास व्हॅक्युम क्लीनरने स्वछ कराव्यात. उशीवरील अभ्रे नियमित बदलणेही आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment