एटीएम मधील खडखडाटामागे निवडणूका हे कारण?


देशातील काही राज्यात बहुटेक सर्व बँकांच्या एटीएम मध्ये नोटांचा खडखडाट असल्याच्या बातम्या मिडियामध्ये चर्चेत असताना या मागची कारणे शोधली जात आहेत. नोटबंदी प्रमाणे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिक रोख रकमेमुळे अडचणीत असल्याचे दृश्य दिसत असले आणि त्यासाठी विरोधी पक्ष सरकारला दोषी धरत असले तरी खरे कारण ५ राज्यात होणार असलेल्या आणि पुढील वर्षात होत असलेल्या लोकसभा निवडणुका हे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

आर्थिक तज्ञ आणि जाणकाराच्या मते निवडणुका तोंडावर आल्या असताना कोणतेही सरकार सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीच पावले टाकणार नाही. रिझर्व बँकही चलन पुरवठा सुरळीत असल्याचे सांगत आहे आणि गेल्या काही दिवसात एटीएम्स मधून तब्बल ४५ हजार कोटीची रक्कम काढली गेली आहे. एरवी महिन्याला सरासरी २० हजार कोटी काढले जात असताना हा आकडा आत्ताच इतका जास्त असण्यामागे निवडणुकांची तरतूद हे मुख्य कारण असू शकते.

नोटबंदी नंतर आयकर विभाग सर्व प्रकारच्या रोख व्यवहारांवर नजर ठेऊन आहे. बाजारातून अचानक २ हजार रुपयाच्या नोटा चलनात कमी झाल्या आहेत. निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना जसा पैसा लागतो तसा उमेद्वारानाही लागतोच. आयकर विभागाचे नजर चुकविण्यासाठी हेच लोक एकदम पैसा काढण्यापेक्षा अगोदरपासून थोडे थोडे पैसे काढण्यावर भर देत असावेत. निवडणुका आल्या कि नेहमीच रोकड रकमेची कमतरता जाणवते . त्यात २०० रु. ५० रु. साठी एटीएम कॅलीबरेट करण्याचे काम सुरु आहे आणि २ हजाराच्या नोटांची साठवण केली जात असल्याने रोकड रकमेची टंचाई निर्माण झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a Comment