सोन्याने मढलेला पाकिस्तानी नवरदेव


लग्न म्हणजे हौस आलीच. त्यातही नवरी कोणते कपडे घालणार, कोणते दागिने घालणार याची उत्सुकता वऱ्हाडी मंडळीना असते. नवरामुलगाही आजकाल कपडे, दागिने याबद्दल जागरूक असतो आणि या निमित्ताने स्वतःची हौस पुरवून घेतो. पाकिस्तानात नुकत्याच पार पडलेल्या एका लग्नात नवरदेवाचे सोन्याने मढलेले फोटो पाहून रातोरात चर्चेला उधाण आले आहे. लाहोरचा व्यापारी हाफिज सलमान शाहीद याचे सोने प्रेम पाहून मंडळी अवाक झाली आहेत.

या नवरदेवाने त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने सोन्याचा सूट, सोन्याचा टाय आणि पायात सोन्याचे बूट असा साजशृंगार केलेला दिसतो आहे. त्याचा सूटवर हिरे मोती जडविले गेले आहेत तर टाय १० तोळे सोन्याचा आहे. त्याचे बूट ३२ तोळे सोन्यातून बनविले गेले आहेत. एकूण त्याचा वर पोशाख २५ लाखांचा आहे. त्याला सोन्याची खूपच आवड आहे पण त्याच्या म्हणण्यानुसार लोक गळ्यात नेकलेस आणि डोक्यावर मुकुट इतकाच सोन्याच्या विचार करतात. मी सोन्याचे बूट घातले आहेत कारण सोने माझ्यासाठी पायाची धूळ आहे हे मला दाखवून द्यायचे आहे. या विक्षिप्त नवरदेवाच्या नवरीने काय पोशाख केला ते मात्र समजू शकलेले नाही.