खऱ्या प्रेमाचे प्रतिक, बुआ हसन तलाव


प्रेमाचे प्रतिक म्हटले की आपल्या नजरेसमोर लगेच ताजमहाल नाहीतर मांडू गड येतो. तश्या भारतात प्रेमाच्या कथा आणि प्रतीके असणारया अनेक जागा आहेत. मात्र खऱ्या प्रेमाची कथा सांगणारी एक अनोखी जागा हरयाणात असून बुआ हसन तलाव या नावाने ती प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक वर्षभर भेट देत असतात.

हि कथा घडली ३८० वर्षापूर्वी हरियानातील झज्जर गावी. असे सांगतात या गावातील मुस्ताफाची मुलगी बुआ १६ वर्षाची असताना पांढरया घोड्यावरून रपेट करताना जंगलात पोहोचली व तेथे तिच्यावर सिंहाने हल्ला केला. त्यावेळी तेथे लाकडे तोडत असलेल्या हसन नावाच्या लाकुडतोड्याने सिंहाशी झुंज घेऊन बुआचे प्राण वाचविले. या हल्ल्यामुळे बेशुद्ध झालेली बुआ शुद्धीवर आल्यावर हसन तिला तिच्या घरी सोडायला गेला तेव्हा झालेला प्रकार ऐकून मुस्तफाने हसनचे आभार मानलेच पण काय बक्षीस हवे असे विचारले तेव्हा हसन ने बुआची मागणी केली. मुस्तफाने ती मान्य केली.


तेव्हापासून बुआ व हसन जंगलात या तलावाकाठी चांदण्या रात्री भेटू लागले. पुढे मुस्तफाने हसनला राजाच्या सैन्यात भरती होण्यास सांगितले व हसन युद्धावर गेला त्यात त्याचा मृत्यू झाला. हे ऐकून बुआला धक्का बसला. हसनचा मृतदेह तलावाकाठी दफन करण्याचा निर्णय तिने घेतला. ती चांदण्या रात्री येथे येऊन हसनच्या आठवणीने कासावीस होत असे. दोन वर्षात तिचाही विरहाने मृत्यू झाला तेव्हा तिलाही हसन जवळ दफन करण्यात आले. त्यानंतर हि जागा खऱ्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखली जाऊ लागली. येथे हा सुंदर तलाव आणि बुआ व हसन याच्या कबरी आहेत.

Leave a Comment