व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर


ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून यापूर्वी विजय चव्हाण यांना राज्य शासनाचाच राजीव गांधी पुरस्कार मिळाला आहे. ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा कला क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो.

चव्हाण यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया दिली. विजय चव्हाण यांना यापूर्वी मोरूची मावशी या नाटकाचे १००० प्रयोग झाले, म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले. तसेच दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे आणि बबन प्रभू, आचार्य अत्रे तसेच १९९६-९७ आणि ९८ असे लागोपाठ ३ वर्ष हास्य अभिनेते म्हणून राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.

जीवनगौरव पुरस्कार ५ लाख रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्काराचे ३ लाख रुपयांचा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्याम भूतकर तर राज कपूर पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या नाना पाटेकर, समीर (गीतकार), सुरेश ऑबेराय आदी समितीने या मान्यवरांची सन २०१८च्या पुरस्कारासाठी निवड केली.

Web Title: V. Shantaram lifetime achievement award declared to actor Vijay Chavan