अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!


मुंबई- शिवसेनेसोबत आगामी निवडणुकीसाठी युती करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कमालीचा आग्रही आहे. जपानमधून परदेशवारी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत परत येताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली. पण अज्ञात कारणाने उद्धव ठाकरेंनी ही भेट टाळली आहे. दरम्यान, भाजप नेत्यांना भेटण्यास उद्धव ठाकरेंनी टाळल्याने युतीच्या चर्चेला ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. सध्या स्थितीत उद्धव ठाकरे भाजप नेत्यांसोबत युतीच नव्हे तर इतर कोणत्याही मुद्यांवर बोलण्यास तयार नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.

शनिवारी उद्धव ठाकरे जपान दौ-यावर परतले आहेत. राज्यात त्याचवेळी विविध विषयांवरून गरमागरमी सुरू आहे. नाणार प्रकल्पावरून वाद पेटलेला असतानाच अहमदनगरमधील हत्याकांडाचा मुद्दा शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला आहे. शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे. तर ३ लाख कोटी रूपयांचा हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात आणायचा आहे. भाजप सरकार याबाबत शिवसेनेला विश्वासात घेत नाही. शिवसेनेची कोकणात मोठी ताकद असल्यामुळे हा प्रकल्प आणला किंवा पाठिंबा दिला तर शिवसेनेला काही प्रमाणात फटका बसू शकतो. त्यामुळे शिवसेना सावध पावले टाकत आहे.