दोन्ही काँग्रेस आणि भाजपच्या संगनमताने झाली दोन शिवसैनिकांची हत्या : एकनाथ शिंदे


नगर : केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या काही नेत्यांनी संगनमताने घडवून आणल्याचा आरोप बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे आज नगरमध्ये केडगाव येथील हत्या झालेल्या त्या दोन शिवसैनिकांच्या दशक्रिया विधीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अमानुषपणे शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. असे धाडस यापुढे कोणी करता कामा नये. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे.

कायद्याचे येथे राज्य आहे की गुंडाचे असा प्रश्न आहे. सर्वांना पोलिस व कायद्याची भीती राहिली पाहिजे. हत्याकांडाचा पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा. हत्याकांड घडल्यानंतर शिवसैनिकांनी भावनेच्या भरात रास्तारोको केला. त्यामुळे त्यांच्यावरील गंभीर गुन्हे मागे घेतले पाहिजेत. शिवसैनिक कधीच पळून जाणार नाहीत. ते स्वतः होऊन अटक होतील.