आंबे विकत घेताना अशी घ्या काळजी


उन्हाळा सुरु झाला की चाहूल लागते ती फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या आगमनाची. एकदा आंबे बाजारामध्ये येऊ लागले, की जिकडे तिकडे आंब्याची विक्री करणारी दुकाने दिसू लागतात. रस्त्याच्या कडेने देखील जागोजागी आंब्यांची विक्री करणारे ठेले दिसू लागतात. मनमोहक सुवास आणि अवीट गोडीचे हे फळ घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसू लागते.

यंदा आंब्यांचा मोसम सुरु होण्याआधीच बाजारामध्ये आंबे दिसू लागले होते. ह्यामागे मुख्य कारण असे, की कॅल्शियम कार्बाईड हे रसायन वापरून वेळेआधी पिकविलेले आंबे बाजारमध्ये उपलब्ध होणे, हे आहे. चंडीगड मधील फळ बाजारामध्ये असे वेळेआधी पिकविलेले आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली असता, येथील स्थानिक प्रशासनाने, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करीत, फळ बाजारामध्ये एक चौकशी समिती पाठवली. इन्स्पेक्शन साठी सरकारी प्रतिनिधी येत असल्याची कुणकुण लागताच, केमिकल लावून पिकविलेले आंबे तसेच सोडून देऊन विक्रेते चक्क पसार झाले.

एकूण तीन क्विंटल केमिकल लावून पिकविलेले आंबे इन्स्पेक्शन टीमने ताब्यात घेऊन नष्ट केले. अशाच घटना देशभरामधील फळ बाजारांमध्ये घडताना दिसत आहेत. यंदाच्या वर्षी बाजारामध्ये आंबे वेळे आधीच दिसू लागले होते. त्यांतील बहुतेक आंबे रसायनच्या मदतीने पिकविलेले होते. रसायन वापरून पिकविलेल्या आंब्यांचा रंग पिवळाधमक दिसत असला, तरी आंब्यांना येणारा सुगंध ह्या आंब्यांना नव्हता, आणि त्यांची चवही गोड नव्हती. आजकाल कमाई वाढविण्याकरिता अनेक विक्रेते रसायनाचा वपार करून फळे पिकवत आहेत, आणि ती बाजारामध्ये विकत आहेत.

ही फळे नैसर्गिक रित्या पिकू दिलेल्या फळांच्या मानाने स्वस्त असली, तरी बेचव असतात, आणि मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकतात. रसायनांच्या मदतीने पिकविलेली केळी तर अक्षरशः एकाच दिवसात काळी पडताना दिसतात. आंबे विकत घेताना ते रसायनाचा वापर करून पिकविले आहेत किंवा नाहीत हे ओळखण्यासाठी प्रत्येक आंबा व्यवस्थित पाहून घ्यावा. आंब्यावर अधे मध्ये हिरवे डाग दिसून येत असले, तर तो आंबा खरेदी करणे टाळावे. रसायन वापरून पिकविलेल्या फळाचा स्वाद कडेकडेने आंबट असतो. तसेच ह्या फळाचा रंगही एकसारखा दिसत नाही. ही फळे दोन ते तीन दिवसांमध्येच काळी पडू लागतात. रसायनाच्या मदतीने पिकविलेली फळे एकसारखी पिकत नाहीत. ह्या फळाचा एक भाग जास्त पिकलेला असतो, तर दुसरा भाग कच्चा राहिलेला असतो.

कॅल्शियम कार्बाईड वापरून फळे पिकविण्यावर न्यायालयाने बंदी घातली असून, ह्या रसायनाचा वापर घातक ठरला आहे. ही पावडर पांढऱ्या रंगाची असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. ह्या रसायनाच्या मदतीने पिकविलेली फळे खाल्ल्यानंतर जास्त तहान लागणे, अशक्तपणा येणे, शरीरावर सूज येणे अश्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाजरातून फळे विकत घेताना काळजी घेणे आवश्यक आहे.