मुस्लिमांमुळे नव्हे, भारत हिंदूंमुळेच धर्मनिरपेक्ष : गौहर रजा


भारत देश मुस्लिमांमुळे नव्हे तर सेक्युलर हिंदूंमुळेच धर्मनिरपेक्ष आहे, असे ठाम प्रतिपादन प्रसिद्ध शायर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गौहर रजा यांनी केले आहे. देशाला वाचवायचे असेल तर अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी अल्पसंख्यकांनी साथ द्यायला हवी, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली येथे आयोजित जश्न-ए-बहार या कार्यक्रमानंतर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. गौहर रजा म्हणाले, ‘‘या देशात मुसलमान आणि दलित या मोठ्या शक्ती आहेत. दलित तर आणखी मोठी शक्ती आहेत. हे दोघे मिळून देश बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.’’

अलीकडेच रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या प्रसंगी झालेल्या धार्मिक हिंसा आणि मुस्लिम भागांमध्ये मिरवणुका काढण्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. रजा म्हणाले, ‘‘प्रश्न राजकीय संस्कृतीचा आहे आणि भाजप ती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. हिंदुत्ववादी शक्ति मुस्लिम किंवा ख्रिस्ती लोकांचा द्वेष करतात असे मला वाटत नाही परंतु हे त्यांचे राजकारण आहे. धार्मिक घोषणा दिल्या जातात तेव्हा ती धार्मिक नव्हे तर राजकीय कृती असते. त्याच्याशी लढण्याचा प्रयत्नही राजकीय असायला हवा.’’

मुसलमान एकट्याने न स्वतःला वाचवू शकतील न देशाला. त्यांना धर्मनिरपेक्ष हिंदूंची साथ द्यायला हवी आणि त्यांनी मिळून लढायला हवे, असेही ते म्हणाले.