नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही : राज ठाकरे


मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचे ते करावे, असे स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

मनसेच्या वतीने मुंबईतील मुलुंडमध्ये १०० महिलांना रोजगाराचे साधन म्हणून रिक्षांचे वाटप करण्यात आले. राज ठाकरेंनी यावेळी झालेल्या सभेत अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुनही भाजपवर गंभीर आरोप केला.

कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही. महाराष्ट्रात हा प्रकल्प झाला नाही, तर गुजरातला जाईल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. पण गुजरातच का? असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचे ते करावे, असे जाहीर आव्हान राज ठाकरेंनी दिले.

राज्यात एक लाख २० हजार विहिरी बांधल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. येथे राज्यात पाणी नाही आणि विहिरी कुठे बांधल्या? महाराष्ट्रातील ४४.९ जमिनीचे वाळवंटीकरण होणार आहे, असा ‘इस्रो’चा रिपोर्ट आहे. मराठवाड्यात तर १२०० फूट खोल गेले तरी पाणी मिळत नाही आणि तरीही मुख्यमंत्री एक लाख 20 हजार विहिरी बांधल्याचे सांगतात. ते का आणि कशासाठी खोट बोलत आहेत? असा सवाल राज ठाकरेंनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची मिमिक्रीही राज ठाकरेंनी करुन दाखवली. यामुळे जोरदार हशा पिकला.

राज ठाकरेंनी जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुन तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय भाजप बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला तिथल्या तिथे ठेचून मारायला हवे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Nanar project will not be in Konkan: Raj Thackeray