कर्नाटक विधानसभा निवडणुकीतून एमआयएमची माघार


हैदराबाद – कर्नाटकात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने घेतला आहे. तसेच जनता दल (नि) यांना या निवडणुकीत पाठिंबा देणार असल्याचे ओवेसी यांनी माध्यमांना सांगितले. जनता दलाला पाठिंबा देणार असून त्यांच्यासाठी प्रचार केला जाणार आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी ओवेसी म्हणाले की, आमच्यावर भाजपचा फायदा होण्यासाठी मत विभागणी केल्याचा आरोप केला जातो. हे बिनबुडाचे आरोप असून गुजरात, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या पक्षाने निवडणूक लढवली नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीपासून आम्ही लांब होतो. काँग्रेसचे या ठिकाणी काय झाले? असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, पुढील महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुका होणार आहेत. एकाच टप्प्यात २२४ जागांसाठी दि १२ मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होणार आहेत. तर मतमोजणी दि. १५ रोजी होईल. सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि भाजपामध्ये यंदा अत्यंत अटीतटीची लढत अपेक्षित केली जात आहे.