मॅगीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह, आढळल्या अळ्या


पालघर – जर भूक लागल्यावर तुम्ही झटपट बनणारी मॅगी सारखी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, नालासोपाऱ्यात एका व्यक्तीला मॅगीमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत.

नालासोपारा येथे एका कुटूंबीयांनी आणलेल्या मॅगीच्या पॅकेटमध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शॉपींग मॉलमधून पूनम शहा या गृहिणीने विकत घेतलेल्या मॅगीच्या पॅकेटमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या पॅकेटवर एक्सपायरी डेट पूर्ण व्हायला अजून आठ महिने बाकी असतानाच मॅगीत अळ्या आढळल्यामुळे सेफ आणि इन्स्टंट फूड म्हणून वारंवार दावा केल्यावरही मॅगीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नालासोपारामधील एका शॉपिंग मॉलमधून येथील गृहिणी पूनम शहा यांनी मॅगीचे पॅकेट विकत घेतले होते. त्यांनी ते पॅकेट घरी आल्यावर फोडले असता त्यातील न्युडल्समध्ये अळ्या वावरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या मॅगीमध्ये असणाऱ्या मसाल्याच्या पॅकेट्समध्येही बुरशी लागल्याचे दिसून आल्याचे पूनम शहा यांनी सांगितले.