कठुआ प्रकरणातील पीडितेच्या महिला वकिलालाही बलात्काराच्या धमक्या


जम्मू काश्मिर : आज न्यायालयात कठुआ येथे आठ वर्षीय असिफावर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी पहिली सुनावणी होणार असून त्याचदरम्यान असिफाचे वकिलपत्र घेतलेल्या दीपिका सिंह राजावत यांनाही या प्रकरणी बलात्काराच्या व हत्येच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे जम्मू-काश्मीरबाहेरील न्यायालयात हे प्रकरण व सुनावणी सादर केले जावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.

जम्मू-काश्मिर येथील कठुआ या गावातील असिफा या ८ वर्षीय चिमुरडीवर १० जानेवारीला बलात्कार करण्यात आला व त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यातील आठ आरोपींवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही केस महिला वकिल दीपिका सिंह राजावत यांनी घेतल्या पासून धमक्या येत आहेत. अशाच प्रकारे तुझाही बलात्कार करून हत्या केली जाईल, तुला माफ केले जाणार नाही अशा धमक्या त्यांना येत आहेत. त्याचबरोबर त्यांना न्यायालयात प्रॅक्टिस करण्यापासून रोखण्यात येत आहे. बार असोसिएशनही मदत करत नाही. तसेच मी हिंदू असून मुस्लिम मुलीची केस स्विकारल्याने मला हिंदू धर्मातून काढून टाकण्याचीही माहिती मला मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

पीडितेचे कुटुंबिय हे प्रकरणाची जम्मू-काश्मीरबाहेर सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या प्रकरणी आरोपींना मिळत असलेल्या आधारामुळेच वकिलांनाही अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत, तसेच पीडितेचे कुटुंबिय ही भीतीच्या छायेत आहेत.