आपल्या कार किंवा स्कूटरचे खरे मायलेज कसे ओळखाल?


स्कूटर, मोटर सायकल किंवा कार खरेदी करताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. त्यामध्ये दोन मुख्य गोष्टींचा विचार असतो, एक म्हणजे आपले बजेट, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीचे मायलेज. म्हणजेच एक लिटर इंधनावर गाडी किती किलोमीटर धावू शकेल ह्याचा अंदाज. गाडी खरेदी करताना ह्या गोष्टीचा विचार करणे महत्वाचे असते. विशेषतः पेट्रोल किंवा डीझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता मायलेजचा विचार आणखीनच महत्वाचा ठरतो. गाड्या तयार करणारी प्रत्येक कंपनी, त्यांनी तयार केलेल्या वाहनाच्या उत्तम मायलेजबद्दल ग्राहकाला खात्री देत असते. एक लिटर इंधनामध्ये ऐंशी किलोमीटर धावू शकणारी दुचाकी किंवा एक लिटर इंधानमध्ये ३० किलोमीटर धावणारी कार कोणाला नको आहे? पण कंपन्या खात्रीपूर्वक सांगतात तेवढे मायलेज गाडी खरोखरच देत आहे किंवा नाही हे अगदी साध्या उपायाचा अवलंब करून जाणून घेता येणे शक्य आहे.

भारतामध्ये अनेक तऱ्हेचे इंधन विकणाऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत. ह्यामध्ये काही कंपन्या एक्स्ट्रा प्रीमियम इंधन ही देतात. त्यामुळे निरनिराळ्या इंधनामुळे मायलेज वर देखील फरक पडत असतो. तसेच गाडी तुम्ही शहरातील गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांवर चालवीत आहात, की शहराच्या बाहेर, किंवा हायवे वर गाडी धावते आहे, यावर देखील गाडीचे मायलेज अवलंबून असते. हायवे वर गाडीचे मायलेज नेहमी अधिक असते, पण त्यासाठी गाडी सलगपणे एका ठराविक वेगावर चालविली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे स्कूटर, मोटर सायकल, किंवा कारचे नेमके मायलेज किती आहे हे जाणून घेण्यासाठी ते वाहन हायवेवर चालवून पाहणे आवश्यक आहे.

कारचे मायलेज जाणून घेण्यासाठी कारचा फ्युएल टँक पूर्ण भरून घ्यावा. त्याखेरीज दहा लिटर अतिरिक्त इंधन आपल्याबरोबर एखाद्या कॅन मध्ये भरून घ्यावे. गाडी चालवायला सुरुवात करण्यापूर्वी गाडीच्या वेगमापकावरील रीडिंग नोंदून ठेवावी. त्यानंतर ट्रीप मीटर झिरोवर करावा. आता हायवेवर कार चालविणे सुरु करून वेग ६० ते ८० किलोमीटर च्या मध्ये असावा. पुन्हा पुन्हा ब्रेक लावणे किंवा गियर बदलणे टाळावे. साधारण शंभर किलोमीटर अंतर पार केल्यानंतर गाडी थांबवावी, आणि आपल्यासोबत असलेले कॅन मधील अतिरिक्त इंधन कारमधे भरावे. त्यानंतर टाकीमध्ये एकूण किती इंधन आहे ते पाहावे. उदाहरणार्थ, जर कारमध्ये ४ लिटर तेल आले असेल, तर शंभराला चाराने भाग द्यावा, त्यांचे उत्तर २५ असे येईल. याचा अर्थ असा, की गाडीचे मायलेज प्रती लिटर इंधनामागे २५ किलोमीटर आहे. मोटर सायकल, किंवा स्कूटरचे मायलेज देखील ह्याच पद्धतीने तपासून पाहता येऊ शकते.

मायलेज तपासून पाहण्याचा हा एक उपाय कितपत खात्रीचा आणि अचूक असेल हे नेमके सांगता येणे कठीण असले, तरी त्यामुळे मायेजचा अंदाज बांधता येणे मात्र नक्की शक्य आहे.

Leave a Comment