नटीचे स्नानदृश्य व्हायरल केल्यामुळे दिग्दर्शकाला अटक


आपल्याच चित्रपटातील नटीचे सेन्सॉर संपादन न झालेले स्नानदृश्य व्हायरल केल्यामुळे एका दिग्दर्शकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दिग्दर्शकाविरुद्ध नटीने तीन महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती.

हे वादग्रस्त दृश्य एका लघुपटातील असून ते व्हायरल केल्याबद्दल पोलिसांनी उपेन्द्र कुमार वर्मा या भोजपुरी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक केली आहे. या चित्रफितीत अठ्ठावीस वर्षांची ही नटी स्नान करताना दिसते, असे टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

या दिग्दर्शकाने ही दृश्यफीत सोशल मीडियावर टाकली होती आणि अश्लील दृश्ये दाखविणाऱ्या तीन संकेतस्थळांवर ती दिसून आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या दिग्दर्शकाच्या विरोधात जानेवारी महिन्यात तक्रार देण्यात आली होती आणि तेव्हापासून तो फरारी होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, असे मुंबई पोलीस उपायुक्त परमजितसिंग दहिया यांनी सांगितल.

“या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण वर्मा याच्या अंधेरी येथील कार्यालयामध्ये गेल्या वर्षी झाले होते. त्यातील स्नानदृश्याचे चित्रीकरण चालू असताना माझा टॉवेल निसटला. मात्र वर्मा याने ते चित्रित केले. मी त्याला ते दृश्य काढून टाकण्यास सांगितले होते व त्याने त्याला संमतीही दिली होती. मात्र काही दिवसांनी मला मित्र व नातेवाईकांकडून हे दृश्य यूट्यूबवर असल्याचे कळाले,“ असे या नदीने तक्रारीत म्हटले आहे.