वयवर्षे ७३ असणारा हा विद्यार्थी पाचवीच्या वर्गामध्ये


ही कहाणी आहे ७३ वर्षीय विद्यार्थ्याची. हा विद्यार्थी सध्या पाचवीच्या वर्गामध्ये शिकत आहे. आपल्या पेक्षा वयाने साधारण साठ वर्षे लहान असलेल्या विद्यार्थ्यांच्या जोडीने हा ७३ वर्षे वयाचा विद्यार्थी अभ्यास करतोच, शिवाय इतर विद्यार्थ्यांच्या जोडीने खेळामध्ये, शारीरिक कसरतीमध्ये देखील उत्साहाने सहभागी होत असतो. आहे ना अनोखी कहाणी? वयाची सत्तरी ओलांडत असताना एखादी व्यक्ती निवृत्ती नंतरच्या आरामशीर आयुष्याच्या कल्पनाविश्वात असते. पण ह्या मेहनती विद्यार्थ्याने मात्र, ह्या वयामध्ये शाळेचा रस्ता धरला आहे. त्याच्या ह्या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिझोरम राज्यातील चम्फाई जिल्ह्यामधील न्यू रुआईकॉन नामक एका लहानशा गावातील शाळेमध्ये, सध्या हा विद्यार्थी शिकत असून, त्यांचे नाव लालरिंगथारा आहे. पेशाने चौकीदार असणारे लालरिंगथारा, आपले शिक्षणाचे स्वप्न पुरे करण्यासाठी शाळेमध्ये भरती झाले आहेत. लालरिंगथारा दिवसा शाळेमध्ये अभ्यास करतात आणि रात्री चौकीदारीची जबाबदारी सांभाळतात.

लालरिंगथारा यांचा जन्म १९४५ साली भारत-म्यानमारच्या सीमेनजीक खुआंगलेंग नामक एका लहानशा गावामध्ये झाला. ते अवघे दोन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. लालरिंगथारा आपल्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य असल्याने, वडिलांच्या मृत्युनंतर ते आणि त्यांची आई असे दोघेच राहू लागले. घर सांभाळण्याची, आणि इतर जबाबदारीची जाणीव लालरिंगथारा यांना अगदी लहान वयातच झाली. घरातील कामांमध्ये देखील ते आपल्या आईची मदत करीत आणि शेतावर कामे करून त्यामधून मिळणाऱ्या पैश्यांमधून दोघे मायलेक आपला उदरनिर्वाह करीत. ह्या सगळ्या व्यापामध्ये लालरिंगथारा यांना फार शिकता आले नाही. आपण खूप शिकावे, काही तरी चांगले करावे हे लालरिंगथारांचे स्वप्न अपुरेच राहून गेले.

उदरनिर्वाहासाठी नोकरी शोधण्याच्या उद्देशाने लालरिंगथारा ह्यांची गावोगाव भ्रमंती सुरु झाली. अखेरीस काही वर्षांपूर्वी, न्यू रुआईकॉन गावातील चर्चमध्ये त्यांना चौकीदारीचे काम मिळाले, आणि त्यानंतर लालरिंगथारा ह्याच गावामध्ये स्थायिक झाले. चर्चच्या जवळ असणारी शाळा पाहून लालरिंगथारा ह्यांचे शिकण्याचे स्वप्न पुन्हा पालवू लागले. मग लालरिंगथरांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला, आणि विद्यार्थी म्हणून ते शाळेमध्ये रुजू झाले. लालरिंगथारा आता पाचवीच्या वर्गामध्ये शिकत असून, इंग्रजी भाषेकडे त्यांचा विशेष ओढा आहे. ह्या भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

Leave a Comment