आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्या अंगी असलेले गुण, महत्वाकांक्षा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण त्याचबरोबर तुम्ही एक उत्तम टीम मेम्बर असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जर तुमचे सतत तुमच्या टीम मेम्बर्सशी कोणत्या ना कोणत्या कारणांवरून मतभेद होत असतील, तर कामाच्या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण होण्यास वेळ लागत नाही. ह्यामुळे तुमची कार्यक्षमता देखील प्रभावित होत असते. त्यामुळे एक चांगला टीम मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक असते. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे.
आपल्या कामाच्या ठिकाणी वातावरण तणावरहित व्हावे या करिता आपल्या टीम मेम्बर्सशी सतत संवाद साधत राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्वांच्याबरोबर सामंजस्याने वागणेही आवश्यक आहे. आपापसातील समस्या, गैरसमज त्या त्यावेळी बोलून सोडविल्यास मनातील पूर्वग्रह निश्चितपणे नाहीसे होतात. आपल्या सहकाऱ्यांशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा संवाद साधावा. हा संवाद केवळ ऑफिसच्या कामासंबंधीच असावा असे नाही, तर अवांतर गप्पादेखल रोचक ठरतात. अश्या संवादाने एक दुसऱ्याच्या प्रती स्नेहभाव वाढतो. मात्र फार वैयक्तिक बाबींवर संभाषण करणे टाळावे.
आपला डेटा, कल्पना, किंवा आपली सजेशन्स आपल्या टीमशी मनमोकळेपणाने शेअर करा. एखाद्या टीम मेम्बरला त्याचे टास्किंग पूर्ण करण्यास अडचण येत असेल, तर पुढे होऊन त्याची शक्य असेल तितकी मदत करा. मदत करताना शांतभावाने करा. तुम्ही तुमच्या टीम मेम्बरची मदत करीत असल्याचा गवगवा करणे टाळा. आपल्या टीम मध्ये काम करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व, विचार करण्याची पद्धत आणि कुवत वेगवेगळी असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अश्यातच प्रत्येकजण आपापल्या परीने आपले श्रेष्ठत्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. अश्या वेळी एकमेकांचे अहंकार दुखविले जाऊन एकमेकांच्या प्रती मनामध्ये क्लेश निर्माण होण्याची शकयता असते. त्यामुळे टीम मध्ये काम करीत असताना आपला अहंकार जरा बाजूला ठेवणे चांगले. इतरांचा परफॉर्मन्स आपल्या पेक्षा जास्त चांगला असला, तर त्यांच्याबद्दल असूया वाटून न घेता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करा.
ऑफिसमध्ये लहान मोठ्या गोष्टींवरून मतभेद होणे ही एक सामान्य बाब आहे. त्यामुळे एखाद्या वादाला सुरुवात होताना दिसली, तर तो शक्यतो तिथल्या तिथेच मिटविण्याचा प्रयत्न करा. तसेच बोलताना तोंडावर ताबा ठेऊन कोणाला अपशब्द बोलणे कटाक्षाने टाळावे. तसेच वाद मिटल्यावर परत परत त्या विषयावर चर्चा करणे टाळा. तसेच तुमच्या टीम मेंबरने काही चांगले काम केले असेल, तर त्याची आवर्जून स्तुती करा. आपल्या इतर टीम मेम्बर्स कडून वाहवा मिळणे हे त्या टीम मेम्बर ला समाधान देणारे आणि पुढील कामासाठी आणखी प्रेरणा देणारे असते.