आपल्या कलीग्ससोबत (सहकर्मचारी) या गोष्टींवर चर्चा करणे टाळा


आपल्या कामाचे अथवा व्यवसायाचे ठिकाण जुने असो किंवा नवे, आपल्या सहकर्मीं सोबत आपले संबंध अतिशय संतुलित असणे महत्वाचे असते. ऑफिसमधील कलीग्स एकदा चांगले परिचयाचे झाले, की काही अंशी व्यक्तिगत असलेल्या गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करू लागतो. घरातील प्रॉब्लेम्स, किंवा मुलांशी, घरातील इतर कोणाशी संबंधित काही अडचणी ह्याची चर्चा आपण आपल्या कलीग्स सोबत अधून मधून करीत असतो. अडचणी ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतातच, पण त्यांबद्दल किती आणि कोणाला सांगायचे ह्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणताही संभ्रम असू नये. आपण आपल्याबद्दल किंवा आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल चर्चा करताना किती तपशीलात शिरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण ज्याच्याशी आपण चर्चा करतो, त्याच्या तोंडून अनवधानाने एखाद्या गोष्टीचा इतर ठिकाणी उल्लेख झाला, तर आपले व्यक्तिगत प्रश्न तितकेसे व्यक्तिगत न रहाता सर्वश्रुत होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठल्या गोष्टी कलीग्स ला सांगणे योग्य आहे आणि कुठल्या गोष्टी न बोलणेच चांगले ह्याचा विचार करणे महत्वाचे आहे.

ऑफिसमध्ये तुम्हाला सॅलरी नक्की किती मिळते त्याचा निवेश तुम्ही कसा करता, या बद्दल चर्चा करणे टाळा. तुमचा पगार आणि तो तुम्ही कसा आणि कुठे खर्च करता ही तुमची वैयक्तिक बाब आहे. त्याची चर्चा इतरांशी करण्याची आवश्यकता नाही. तसेच आपल्या आयुष्यातील भावी योजना काय आहेत याची करणे ही टाळावे. विशेषतः त्तुम्ही ज्या ठिकाणी काम करीत आहात तिथल्या पेक्षा चांगल्या संधी इतर कुठे तुम्हाला मिळणार असतील आणि तिथे जाण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर त्याची उघडपणे वाच्यता करणे टाळा. योग्य वेळ आली की केवळ संबंधित वरिष्ठांना ह्या गोष्टीची कल्पना द्यावी.

आपल्या कामाच्या ठिकाणी निरनिराळे लोक आपल्या संपर्कामध्ये येत असतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व, विचार आपल्याला पटतातच असे नाही. म्हणून त्या व्यक्तीविषयीची नापसंती, जगजाहीर करू नये. एखाद्या व्यक्तीबद्दलची आपली वैयक्तिक मते स्वतः जवळच ठेवावीत. तसेच आपल्याला अप्रिय असणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर उघडपणे टीका करणे आवर्जून टाळावे.

आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल चर्चा करणे टाळावे. आपल्या घरातील विवाद, आपली जीवनशैली, किंवा आपण करीत असलेल्या आर्थिक गुंतवणुकी, मालमत्ता याबद्दल तपशीलवार चर्चा करणे टाळावे. जर कधी कुठ्ल्या बाबतीत सल्ल्याची आवश्यकता वाटली तर त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मदत घेणे योग्य ठरेल.

Leave a Comment