दिल्लीत 15 ऑगस्टपासून धावणार वाफेच्या इंजिनाची रेल्वे


देशातील सर्वसामान्य लोकांना रेल्वेच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आणि वाफेच्या इंजिनांबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे आता वाफेच्या इंजिनावर धावणारी गाडी चालवणार आहे. राजधानी दिल्लीत येत्या 15 ऑगस्टपासून ही गाडी दर रविवारी धावेल. गढी हरसरू स्थानकापासून फारूख नगरपर्यंत ही रेल्वे धावेल.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी ही माहिती दिली. येत्या 63व्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने नवी दिल्ली ते जुनी दिल्ली अशी गाडी सुरू करण्यात आली आहे. त्याची माहिती देताना त्यांनी ही घोषणा केली.

वाफेच्या इंजिनावर धावणारी ही गाडी दोन डब्ब्यांची असेल. सामान्य श्रेणीचे तिकिट काढून लोक या गाडीत बसू शकतील. गढी हरसरू ते फारूख नगरपर्यंतचा प्रवास साधारण 11 किलोमीटर असेल. ही गाडी धावल्यामुळे लोकांना वाफेच्या इंजिनांच्या अभिमानास्पद इतिहासाची माहिती होईल, असे ते म्हणाले.

रेल्वेच्या वारशाबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतीय रेल्वेने जुन्या दिल्लीपासून नवी दिल्ली स्थानकापर्यंत भारताने 1947 साली अमेरिकेतून आयात केलेले ‘आझाद’ हे वाफेचे इंजिन चालवले. या इंजिनसोबतच्या खास डब्ब्यात 25 मुलांना प्रवास घडवण्यात आला.

Leave a Comment