लुधियानात सुरु झाले पहिले विमान रेस्टोरंट


माणसाच्या कल्पनांना नेहमीच आकाश ठेंगणे असते. कुणाला काय कल्पना सुचेल याचा अंदाज बांधणे तसे अवघडच. विदेशी पर्यटनात असे अनेक चमत्कार म्हणजे वेगळ्या इमारती, हॉटेल, बगीचे आपल्याला पाहायला मिळतात. भारतही त्यात फारसा मागे नाही. देशातील पहिले प्लेन म्हणजे विमानातील रेस्टोरंट लुधियाना येथे सुरु झाले असून त्याचे नाव आहे हवाई अड्डा.


हे रेस्टोरंट भंगारात निघालेल्या एअरबस ३२० जातीच्या विमानात सुरु केले गेले आहे. दिल्लीमधून चार ट्रक मधून हे विमान तुकड्यांनी येथे आणले गेले आणि नंतर पुन्हा जोडून त्याचे रेस्टोरंटमध्ये रुपांतर केले गेले. या विमानात खरे तर १८० प्रवासी बसू शकतात. मात्र रेस्टोरंट करताना ग्राहकांना अडचण वाटू नये म्हणून ७२ जणांची बसण्याची सोय केली गेली आहे. इंजिनिअर लोकांनी खूप मेहनत घेऊन हे विमान रेस्टोरंट प्रमाणे सजविले आहे. परमजीतसिंग लुथर याचे मालक असून त्यांना ही कल्पना महाराजा एक्स्प्रेस रेल्वेवरून सुचली.

या हवाई अड्ड्यात कॅफे, पार्टी हॉल, बेकरी असून येथे फक्त शुद्ध शाकाहारी पदार्थ सर्व्ह केले जातात. हा हवाई अड्डा पाहण्यासाठी लोक दूरदुरून येत आहेत.

Leave a Comment