अॅक्ने विरहित सुंदर त्वचा राखण्यासाठी काही विशेष टिप्स


वयात आल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्समद्धे अनेक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाले, की त्याचा परिणाम अॅक्नेच्या रुपामध्ये त्वचेवर दिसून येऊ लागतो. चेहरा, छाती, पाठ ह्या भागांवर लहान मोठ्या पुटकुळ्या येऊ लागतात. क्वचित ह्यामध्ये इन्फेक्शन होऊन पस होतो. अनेकदा मुरुमे पुटकुळ्या गेल्या तरी त्यांचे डाग मात्र कायम राहतात. अलीकडच्या काळामध्ये ह्या बद्दल होत असलेल्या रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे, की हार्मोन्स मध्ये असंतुलन असण्याखेरीज आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये काय खातो, कितपत व्यायाम करतो, आपली झोप व्यवस्थित आहे किंवा नाही ह्या गोष्टींचा देखील अॅक्नेशी थेट संबंध आहे. विशेषतः आहारामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असणाऱ्या व्यक्तींना अॅक्नेची समस्या जास्त प्रमाणामध्ये भेडसावते असे तज्ञ म्हणतात. सर्वसाधारणपणे हार्मोन्सचे असंतुलन, असंतुलित आहार, बॅक्टेरिया चा प्रादुर्भाव ह्या कारणांनी अॅक्ने ची समस्या उद्भवताना दिसते.

ह्या समस्या टाळण्यासाठी काही उपायांचा कायमस्वरूपी अवलंब केल्याने हार्मोन्सचे असंतुलन सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहारामध्ये काही प्राथमिक बदल करायला हवेत. आपल्या आहारामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा अधिक समावेश करावा. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये ह्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. मैदा, साखर ह्यांचे प्रमाण कमी करावे. तसेच दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करावे. शरीराला आवश्यक असणारी प्रथिने बदाम, जवस, नारळ इत्यादी पदार्थांच्या वापराने मिळविता येऊ शकतात.

दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकले जातात, आणि त्वचेला आर्द्रता मिळते. परिणामी त्वचा सुंदर दिसू लागते. आपल्या आहारामध्ये झिंक असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. झिंक आपल्या शरीरामध्ये अँटी बायोटिक प्रमाणे काम करते. त्यामुळे त्वचेवर असणारी बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर होण्यास मदत मिळू शकेल. तसेच प्रोसेस्ड खाद्यपदार्थांच्या ऐवजी जैविक खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. त्याचप्रमाणे ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. मासे, सुका मेवा ह्यामध्ये ओमेगा ३ मोठ्या प्रमाणावर आहे.

भोजन करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी किंवा शिजविलेले अन्न ठेवण्यासाठी प्लास्टिक च्या प्लेट, वाट्या, ग्लासेस, डबे ह्यांचा वापर न करता स्टील किंव काचेच्या भांड्यांचा वापर करा. प्लास्टिकच्या भांड्यातून हार्मोन्सच्या समान रसायने अन्नामध्ये समाविष्ट होत असतात. त्यामुळे प्लास्टिकचा वापर आवर्जून टाळावा. शरीराला योग्य ती विश्रांती मिळेल ह्याची खबरदारी घ्यावी. मानसिक तणावामुळे देखील हार्मोन्सचे सन्तुलन बिघडते. त्यामुळे तणाव कमी करण्याचे प्रयत्न करावेत.