घरातील ह्या वस्तू नियामिपणे बदलत राहणे आवश्यक


आपल्या घरामध्ये आपल्या दैनंदिन वापरातील अश्या अनेक वस्तू आहेत, ज्यांचा वापर आपण अगदी नियमित पणे करीत असतो. जर ह्या वस्तू तुटल्या, खराब झाल्या तरच त्या बदलल्या जातात. पण वास्तविक ह्या वस्तू किती काळ वापरण्यास आरोग्य्याच्या दृष्टीने सुरक्षित आहेत, ह्याचा विचार आपण क्वचितच करीत असतो. वैज्ञानिकांच्या मते आपल्या नियमित वापरातील काही वस्तू खराब झाल्या असोत किंवा नसोत, ठराविक काळानंतर बदलल्या जायलाच हव्यात. अश्या ह्या वस्तू कोणत्या आहेत या बद्दल माहिती खास माझा पेपरच्या वाचकांसाठी.

दात आणि एकंदर तोंडाचे आरोग्य ही अतिशय महत्वाची बाब आहे. त्यासाठी आपण टूथब्रशचा दररोज वापर करीत असतो. दातांची व्यवस्थित सफाई व्हावी ह्या करिता आपला टूथब्रश दर दोन महिन्यांनी बदलणे आवश्यक आहे. तसेच जर एखादी व्यक्ती एखाद्या मोठ्या आजारातून बरी झाली असेल, तर ती व्यक्ती वापरत असेलेला टूथब्रश आवर्जून बदलावा. दात ब्रश करून झाल्यानंतर टूथब्रश ओला राहणार नाही याची काळजी घ्यावी. ओल्या टूथब्रश मध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव अधिक जलद गतीने होत असतो. त्यामुळे ब्रश करून झाल्यानंतर टूथब्रश टॉवेलने पुसून कोरडा करावा.

केस विंचरण्यासाठी वापरला जात असलेला हेअर ब्रश किंवा कंगवा देखील सहा महिन्यांच्या पेक्षा अधिक वापरणे टाळावे. तसेच कंगवा वापरात असेपर्यंत नियमितपणे साबणाने आणि पाण्याने स्वछ धुवावा. त्याचप्रमाणे आपण घरामध्ये वापरत असलेल्या सपाता किंवा स्लीपर्स दर काही काळाने बदलाव्या. वैज्ञानिकांच्या मते सपाता दर सहा महिन्यांनी बदलल्या जायला हव्यात. सपाता वापरामध्ये असे पर्यंत नियमितपणे धुवायला हव्यात.

त्याचप्रमाणे आपण वापरत असलेल्या उश्या दर तीन महिन्यांनी धुवून काढणे आवश्यक आहे. आजकाल बाजारामध्ये धुता येतील अश्या मटेरियलने बनविलेल्या उश्या मिळतात, त्यांचा वापर करावा. तसेच उश्या दर तीन वर्षांनी बदलून टाकाव्यात. आपण आंघोळीसाठी वापरत असलेले टॉवेल पूर्वीप्रमाणे पाणी शोषून घेईनासे झाले, की ते बदलण्याची वेळ आली आहे हे ओळखावे. आपण वापरत असलेले टॉवेल दररोज धुवून कडक उन्हामध्ये वाळवावेत. ओल्या राहिलेल्या टॉवेलमध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव जलद गतीने होत असतो. त्यामुळे टॉवेल व्यवस्थित कोरडे असतील ह्याची काळजी घ्यावी.

स्वयंपाकघरामध्ये भांडी धुण्यासाठी वापरला जाणारा स्पंज किंवा स्क्रबर दर दोन महिन्यांनी बदलायला हवा. भांड्यांवर चिकटलेले अन्न साफ करण्यासाठी हा स्पंज वापरला जात असतो. त्यामुळे दर वेळी भांडी धुतली गेली की हा स्पंज साबण आणि पाण्याचा वापर करून स्वछ करणे आवश्यक आहे. तसेच स्पंज स्वछ केल्यानंतर तो हवेशीर जागी ठेवावा, जेणेकरून तो व्यवस्थित वाळेल. ओल्या स्पंजमध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव लवकर होतो. तसेच स्पंज कीटाणूविरहित करण्यासाठी दर तीन चार दिवसांनी उकळत्या पाण्यामध्ये काही मिनिटांकरिता बुडवून ठेवावा. त्यानंतर घट्ट पिळून वाळू द्यावा.

Leave a Comment