लग्नानिमित्त मेजवानी मध्ये आता पिझ्झाचा समावेश


घरामध्ये लग्नसोहोळा म्हटला, की पाहुणे मंडळींनी गजबजलेले घर, लगबग, सतत काही ना काही वस्तूंची, कपड्यांची खरेदी, पत्रिका, आणि मुख्य म्हणजे विवाह सोहोळ्याच्या दिवशी असणाऱ्या मेजवानीचा मेन्यू ठरविताना उडणारा गोंधळ असे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर हमखास उभे राहते. लग्नाच्या मेजवानीचा मेन्यू ठरविणे ही फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे पंगत असावी की बुफे इथपासून जेवणामध्ये कोणते कोणते पदार्थ असावेत ह्यावर घरतल्या प्रत्येकाची आपापली मते असतात. तसेच भोजनाअगोदर स्नॅक्स किंवा स्टार्टर्स असणे ही पद्धत देखील आता रूढ होत चालली आहे. त्यामुळे मुख्य जेवणामध्ये काय पदार्थ असावेत ह्यासोबत स्नॅक्स काय असावेत ह्याचा ही विचार करावा लागतो.

पण आता स्टार्टर म्हणून नेहमीचे पनीर, किंवा तत्सम पदार्थाच्या ऐवजी चक्क पिझ्झाचा समावेश मेन्यू मध्ये केला जात आहे. पिझ्झा हा लहान मोठ्या सर्वांनाच प्रिय असून, इतर स्टार्टर्स च्या तुलनेत पिझ्झाला सर्वांचीच पसंती मिळते आहे, असे फिमेलफर्स्ट डॉट कॉम ने केलेल्या सर्वेक्षणावरून समजते. पिझ्झा सर्वांच्या आवडीचा तर आहेच, शिवाय वाढण्यास सोपा आहे. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार हवा तेवढा पिझ्झा उचलून घेऊ शकतो.

पिझ्झा म्हणजे जंक फूड अशी कल्पना आता राहिलेली नाही. आता पिझ्झा देखील अनेक हेल्दी ऑप्शन वापरू बनविला जाऊ शकतो. अगदी लो फॅट चीजपासून ते लो कॅलरी टॉपिंग्स पर्यंत सर्व पर्याय आजकाल पिझ्झामध्ये उपलब्ध असतात. तसेच आजकाल लॅक्टोज फ्री किंवा ग्लुटेन फ्री पर्याय देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे डायटच्या बाबतीत काटेकोर असणाऱ्या व्यक्तींना देखील पिझ्झा खाताना दहावेळा विचार करण्याची आवश्यकता नाही. तसेच प्रत्येकाच्या आवडीनुसार शाकाहारी, मांसाहारी पर्याय देखील यामध्ये उपलब्ध असतात.

पिझ्झामध्ये अनेक तऱ्हेचे फ्लेवर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ एखादाच पर्याय न ठेवता, तीन चार प्रकारच्या फेल्वर्सचा पर्याय ठेवता येईल. पिझ्झा पारंपारिक भोजनाच्या मानाने स्वस्तही पडतो. तसेच पिझ्झा मधेच अनेक व्हरायटी असल्याने स्टार्टर्स मध्ये निरनिराळे पदार्थ न ठेवण्याच्या पर्यायाचा विचार करता येऊ शकेल. पिझ्झा प्रमाणेच निरनिराळ्या प्रकारचे केक्स देखील पिझ्झाच्या सोबत ठेवता येतील. असा हा आगळा वेगळा स्टार्टर्स चा मेन्यू पाहुण्यांना नक्कीच पसंत पडेल.