सर्वात तिखट मिरची खाल्ल्याने हॉस्पिटलमध्ये व्हावे लागले भरती


अनेकदा अनेक लोक काही बाही वस्तू खाण्याचे प्रयोग करताना आपण पाहत असतो. चित्र विचित्र पदार्थ खाण्याच्या सपर्धा देखील आयोजित होत असतात. तशाच एक स्पर्धेमध्ये जगामध्ये सर्वात तिखट, जळजळीत मिरची खाण्याची स्पर्धा ठेवली गेली असता, एका व्यक्तीने ही मिरची खाल्ली खरी, पण त्यानंतर त्या व्यक्तीची प्रकृती इतकी बिघडली, की त्याला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली.

कॅरोलीना रिपर नामक ही मिरची जगामध्ये सर्वात तिखट मिरची समजली जाते. गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झालेल्या नोंदीनुसार कॅरोलीना रिपर ह्या मिरचीपेक्षा अधिक तिखट असणारी मिरची ह्या जगामध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे ही मिरची खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीची अवस्था काय होईल, ह्याची कल्पना न केलेलीच बरी. एका चौतीस वर्षीय व्यक्तीने ही मिरची एका स्पर्धेमध्ये खाल्ली, आणि मिरची खाल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याला रुग्णालयात धाव घ्यावी लागली.

हे मिरची खाल्ल्याच्या काही क्षणातच त्या व्यक्तीच्या घशाला भयंकर कोरड पडली, उलट्या होऊ लागल्या, घश्यामध्ये भयंकर वेदना होऊ लागल्या आणि तीव्र डोकेदुखी सुरु झाली. हा त्रास काही दिवस सुरूच राहिला. ह्या व्यक्तीचा सिटी स्कॅन केल्यानंतर त्याच्या मेंदूच्या नसा आकुंचन पावल्याचे दिसून आले. ह्याला रिव्हर्सीबल व्हॅसोकन्स्ट्रिक्शन सिंड्रोम असे म्हटले जाते. हा विकार काही काळाने बरा होणारा असला, तरी त्यामुळे होणारा त्रास सध्या ह्या व्यक्तीला भोगावा लागत आहे. ही मिरची खाल्ल्याने ह्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा आकुंचन पावल्या असून, अनेक दिवसांनंतर देखील तोंडामध्ये आग होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, छातीमध्ये जळजळ, आणि पोटदुखी अश्या समस्यांचा सामना ह्या व्यक्तीला करावा लागत आहे. त्याचबरोबर सतत ताप ही येत आहे.

मिरच्या किती तिखट आहेत ह्याचा अंदाज स्कोव्हील स्केल वरून घेतला जातो. हॅलपिनो ह्या जातीची मिरची ह्या स्केल वर दहा हजार अंक तिखट मापली गेली तर कॅरोलीना रिपर ह्या मिरचीचा तिखटपणा १.६ मिलियन अंक मापाला गेला. ह्यावरून ही मिरची कितपत तिखट असेल, ह्याची कल्पना आपण करू शकतो.

Leave a Comment