गांधीजींचे नाव घेताना चुकले मोदी


मोतिहारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चंपारण सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिहारच्या मोतिहारी येथे होते. मोदींनी भाषणाची सुरूवात भोजपूरी भाषेत केली, पण मोदींनी भाषण करताना महात्मा गांधींचे चुकीचे नाव घेतले. मोदी भाषण करताना म्हणाले, मोहनलाल करमचंद गांधी यांना बिहारने महात्मा बनवले, त्यांना बापू बनवले. वास्तविक महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. पण मोहनलाल पंतप्रधान चुकून म्हणाले.


कॉंग्रेस नेता गौरव पंधी यांनी मोदींच्या या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. मोदींनी बिहारमध्ये पुन्हा महात्मा गांधींना मोहनलाल करमचंद गांधी म्हटले. मोदी राष्ट्रपिताचे नाव माहीत नसलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, की असे त्यांनी जाणूनबुजून केले. गांधीजींचे नाव मोहनदास करमचंद गांधी आहे हे ५ वर्षाच्या चिमुकल्यालाही माहिती असल्याचे ट्विट त्यांनी केले. मोदींकडून अशाप्रकारची चुक पहिल्यांदाच झालेली नाही, तर त्यांनी गांधीजींचे नाव घेताना अनेकदा चूक केली असल्याचा आरोपही कॉंग्रेसच्या या नेत्याने केला आहे. मोदींची गौरव यांच्या ट्विटनंतर लोकांनी खिल्ली उडवण्यास सुरूवात केली.

Web Title: Modi made a big mistake when taking Gandhi's name