जगभरात १२० देशात होणारया रामलीलेचा विशाल संग्रह होणार

भारत ही रामभूमी असली तरी जगातील विविध १२० देशात रामलीला विविध स्वरुपात साजरी केली जाते. काही देशात ती भव्य स्वरुपात होते तर काही ठिकाणी अगदी साधेपणाने होते. या सर्व विविध रामलीलाची माहिती जमा करून त्याचा विशाल संग्रह तयार केला जाणार आहे. या निमित्ताने विश्वपटलावर रामायण देशांचा एक समूह बनविला जात असून त्यासाठी अयोध्या संशोधन संस्थेने तयार केलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून पाच वर्षाच्या या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षात ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

 

इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड या देशात सीताहरणापासून रामकथा सुरु होते आणि रावण वधावर संपते. कॅरेबीयन देशात रावण वध महत्वाचा असतो तर भारतात रामजन्मापासून रामकथा सुरु होते ती रामाच्या देहविसर्जनाला संपते. या सर्व कथा आणि रामलीला साजरी करण्याच्या पद्धती एकत्र करून मर्यादा पुरुषोत्तम रामाचे व्यक्तिमत्व या देशांना समजून सांगण्याचे आणि रामाचा आदर्श आपल्या रोजच्या जीवनात आणण्याचे प्रयत्न यातून केले जाणार आहेत. रामायण वैश्विक यात्रा या नावाने हा प्रकल्प सुरु केला जात असून जगातील १२० देशात राम कथांसंबंधी पुरावे मिळाले आहेत त्याचे एकत्रीकरण केले जाणार आहे.