टोरेट सिंड्रोम म्हणजे काय? अशी ओळखा ह्याची लक्षणे


सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हिचकी’ ह्या चित्रपटाला दर्शकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. ह्या चित्रपटामध्ये राणीने एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. ह्या शिक्षिकेला टोरेट सिंड्रोम नामक विकार आहे. आजवर फारसा ऐकिवात नसलेला आजार ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आला आहे. ह्या आजारामध्ये शरीराची तंत्र सुरळीत काम करीत नसल्यामुळे ह्या व्याधीने ग्रस्त रुग्ण चित्रविचित्र शारीरिक हालचाली करू लागतो. ह्या हालचालींवर रुग्णाचे बहुतेकवेळा नियंत्रण नसते. घशातून अनेकदा निरनिराळे विचित्र आवाज येणे, सतत उचकी लागणे, एकाच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारणे, सतत एखाद्या गोष्टीचा वास घेत राहणे, डोळ्यांच्या पापण्यांची सतत उघडझाप करणे, ओठांच्या विचित्र हालचाली अश्या निरनिराळ्या हालचाली टोरेट सिंड्रोम असलेले रुग्ण करू लागतात.

ह्याच कारणांमुळे ह्या रुग्णांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असतो. एक तर ह्या आजाराबद्दल सामान्य माणसांना फारशी माहिती नसते, त्यामुळे ह्या रुग्णांच्या अडचणी समजून घेतल्या जाऊ शकत नाहीत. टोरेट सिंड्रोम ही एक नर्व्हस डीसॉर्डर असून, त्यामुळे शरीराच्या स्नायूंमध्ये सतत ‘ टिक्स ‘ येत असतात, म्हणजे स्नायुंच्या निरनिराळ्या हालचाली होत असतात. स्नायू अचानक आकुंचन पावल्यामुळे हे टिक्स किंवा हालचाली निर्माण होत असतात. हे टिक्स सुरु झाले की रुग्णाचे हावभाव बदलू लागतात आणि स्पष्ट बोलण्यात अडचणी येतात. मेंदूमध्ये असलेले न्युरोट्रान्समीटर्स सुरळीत काम करीत नसल्याने हा आजार उद्भवतो. अनेकदा हा आजार अनुवांशिक असू शकतो.

हा आजार असणाऱ्या व्यक्त्तींमध्ये काही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. ही लक्षणे वारंवार दिसून येऊ लागतात. दातांवर दात घासणे, खांद्यांची वरखाली हालचाल, डोळे गोल गोल फिरविणे, डोके सतत हलवत राहणे, उचकी लागणे, एकसारखे आवाज सतत काढत राहणे, जोरजोराने ओरडणे अशी काही लक्षणे ह्या रोगाची आहेत. हा आजार असणारी व्यक्ती आपल्या आजारामुळे समाजामध्ये मोकळेपणाने वावरण्यास कचरते. ह्या रोगाच्या उपचारार्थ अनेक थेरपी आहेत. तसेच ह्या रोगासाठी औषधोपचार देखील आहेत. थेरपी आणि औषधांमुळे ह्या रोगावर काही अंशी नियंत्रण ठेवता येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment