गिनीज बुकात जपानच्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तीची नोंद


टोकियो – सध्याच्या घडीला मनुष्याचे आयुष्यमान हळूहळू कमी होत साठी किंवा सत्तरीपर्यंत आले असून अशात आयुष्याची शंभरी साजरी करणे म्हणजे फार कठिणच. पण ११२ वर्ष वय असलेली व्यक्ती हयात असून ही व्यक्ती निरोगी जीवन जगत आहे, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे! ११२ वर्ष वय असलेली व्यक्ती जपानमध्ये असून तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

११२ वर्षीय या व्यक्तीचे नाव मसाझो नोनाका असे असून ते उत्तर जपानच्या होक्काइदो या परिसरात राहतात. त्यांचा जन्म २५ जुलै १९०५ साली झाला. त्यांनी नुकतेच जगातील वयोवृद्ध पुरूष म्हणून गिनीज बुकमधील विक्रमाचे प्रमाणपत्रही स्वीकारले, अशी माहिती शिनहुआ या स्थानिक माध्यमाने दिली आहे. अशोरो या त्यांच्या जन्मगावी महापौरांनी नोनाका यांना केक भरवत त्यांचा गौरव केला.

आपल्याला सुमो कुस्ती पाहणे आणि संगीत ऐकणे आवडत असल्याचे सांगून आजही आनंदी आयुष्य व्यतीत करत असल्याचे त्यांनी सांगितले. नोनाका यांची कामगिरी लक्षणीय असून नोनाका यांनी आपल्या सर्वांना आयुष्य कसे जगावे याचा धडाच दिल्याचे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेनडे यांनी म्हटले आहे.

नोनाका यांचा पणतू कोकी कुरोहाता म्हणाला, की त्यांनी आरोग्याच्या कुठल्याही सुविधा आतापर्यंत घेतलेल्या नाहीत. त्यांची स्मरणशक्ती अफाट आहे. ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. जगातील सर्वात वयोवृद्ध असलेल्या जमैकाच्या रहिवासी व्हायोलेट ब्राउन यांचे सप्टेंबर २०१७मध्ये वयाच्या ११७व्या वर्षी निधन झाले. तर जपानच्या कागोशिमा प्रांतातील रहिवासी नबी तजिमा यांची जगातील वयोवृद्ध महिला म्हणून गिनीजने गौरव केला आहे. त्यानंतर नोनाका यांचे नाव जगातील वयोवृद्ध पुरूष म्हणून विक्रमात नोंदले गेले आहे.

Leave a Comment