यूट्यूब चोरत आहे लहान मुलांची माहिती – बाल संरक्षण संघटनेचा दावा


तेरा वर्षांखालील मुलांची माहिती गोळा करून त्यांना जाहिराती दाखवून गुगल आणि यूट्यूब हे बाल संरक्षण कायद्याचा भंग करत असल्याची तक्रार बाल संरक्षण आणि आणि गोपनीयता संघटनांच्या एका महासंघाने केली आहे. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनकडे (एफटीसी) या महासंघाने या संदर्भात तक्रार नोंदविली आहे.

एकट्या अमेरिकेत यूट्यूबची पालक कंपनी असलेली गुगल 13 वर्षाखालील लाखो मुलांचा डेटा गोळा करते. गुगल हे जाणूनबुजून करते आणि त्यासाठी पालकांची संमती घेण्यात येत नाही. बालकांच्या ऑनलाईन संरक्षण कायद्यातील (सीओपीएए) तरतुदींचा हा भंग आहे, असे या महासंघाने म्हटले आहे.

सेंटर फॉर डिजिटल डेमॉक्रसी, कॅम्पेन फॉर अ कमर्शिअल-फ्री चाइल्डहूड आणि कंझ्युमर वॉचडॉग या संघटनांचा या महासंघात समावेश आहे. खासगीपणाच्या उल्लंघनांबाबत गुगलवर निर्बंध घालावेत, अशी या गटाने एफटीसीकडे मागणी केली आहे.

“लोकप्रिय कार्टून्स, नर्सरी ऱ्हायम्स आणि खेळण्यांच्या जाहिराती असलेले यूट्यूब हे संकेतस्थळ 13 वर्षांखालील बालकांसाठी नाही, असा दावा करून गुगलने वर्षानुवर्षे मुले आणि कुटुंबियांप्रती आपली जबाबदारी टाळली आहे. आता एफटीसीने बेकायदा माहिती गोळा केल्याबद्दल गुगलला उत्तरदायी ठरविण्याची वेळ आली आहे,”असे सीसीएफसीचे संचालक जोश गोलिन म्हणाले.

Leave a Comment