दररोज सनस्क्रीन लावणे गरजेचे कशासाठी?


त्वचेच्या निगेबाबत बोलायचे झाले, तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा, की घराबाहेर पडताना सनस्क्रीन आवर्जून लावले जावे किंवा नाही. घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावायलाच हवे ह्या तज्ञांच्या सल्ल्याचा तुम्ही तितक्याशा गांभीर्याने विचार केला नसेल, पण सनस्क्रीन व वापरल्यामुळे त्वचेवर दिसून येणारे दुष्परिणाम पाहता, ह्याचा वापर करणे गरजेचे आहे असे आढळून येईल. सनस्क्रीन न वापरल्यामुळे त्वचेवर, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असमान टॅनिंग होते. त्यामुळे त्वचेचा पोत देखील असमान दिसू लागतो. क्वचित प्रसंगी त्वचा उन्हामुळे भाजल्याप्रमाणे लालसर दिसू लागते. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.

त्वचेचा कर्करोग उद्भाविण्याचे वाढते प्रमाण सध्या दिसून येऊ लागले आहे. वातावरणातील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचेला अपाय होत असतो. परिणामी त्वचेचा कर्करोग उद्भाविण्याचा धोका संभवतो. अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे होणारा ‘नॉन मेलानोमा’ ह्या प्रकारामध्ये मोडणारा कर्करोग बरा होण्याची शक्यता पुष्कळ जास्त असते, तर ‘मेलानोमा’ ह्या प्रकारामध्ये मोडणारा कर्करोग प्राणघातक ठरू शकतो. त्वचेचा रंग गोरा असो, सावळा असो, किंवा आणखी कोणताही असो, त्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून त्वचेचा बचाव करायचा असेल, तर सनस्क्रीनचा नियमित वापर करणे आवश्यक आहे.

जर त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीनचा नियमित वापर केला जात नसेल, तर उन्हामुळे त्वचेवर काळे डाग, म्हणजेच सन स्पॉट येऊ लागतात. तसेच पिग्मेंटेशन होऊ लागते. एकदा का त्वचेवर हे काळे डाग येऊ लागले, की ते नाहीसे होणे कठीण होऊन बसते. असे हे सन स्पॉट किंवा पिग्मेंटेशन त्वचेवर होऊ नये या करिता सनस्क्रीनचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. काही व्यक्तींची त्वचा अतिशय संवेदनशील असते. अश्या व्यक्तींना फोटोसेन्सिटिव्ह डीसॉर्डर होऊ शकतात. ही समस्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे आणखीनच गंभीर होऊ शकते. त्यामुळे त्वचेवर व्रण येऊ शकतात. हे टाळण्यासाठी सनस्क्रीनचा नियमित वापर आवश्यक आहे. केवळ घराबाहेर पडतानाच नाही, तर घरामध्ये असताना देखील दररोज सनस्क्रीनचा वापर करणे त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment