आता हेअर डाय बनवा घरच्याघरी


आजकाल केवळ पांढरे केस लपविण्यासाठीच हेअर डायचा वापर केला जात नाही. आजची तरुणाई फॅशन म्हणून देखील निरनिराळे हेअर डाय वापरत असते. बाजारामध्ये अनेक रंगांचे, आणि ब्रँडचे डाय उपलब्ध आहेत. पण यापैकी बहुतेक डाय मध्ये निरनिराळी रसायने वापरली जात असून, कालांतराने त्यांचे दुष्परिणाम केसांवर दिसू लागतात. त्यामुळे हेअर ड्रेसर ने एखादा डाय ‘ नो डॅमेज ‘ असल्याची कितीही खात्री दिली, तरी तशी खात्री आपल्याला वाटेल असे नाही. त्यामुळे बाजरातील हेअर डाय वापरण्याऐवजी घरच्याघरी, संपूर्णपणे नैसर्गिक वस्तू वापरून तयार केलेले हेअर डाय, केसांना कोणत्याही प्रकारचा अपाय होईल अशी भीती न बाळगता वापरले जाऊ शकतात.

बीटामध्ये लोह आणि गाजरामध्ये अँटी ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे लालसर झाक असलेले केस हवे असल्यास ह्या दोन्हींच्या रसाचा वापर करता येईल. या दोन्ही भाज्यांचा रस काढून एका स्प्रे बॉटल मध्ये भरावा आणि केसांवर स्प्रे करावा. तसेच जर रस स्प्रे करायचा नसेल तर बीट आणि गाजर दोन्ही एकत्र वाटून घेऊन त्याची जाडसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट ब्रशच्या मदतीने केसांना लावून घ्यावी. ही पेस्ट केसांवर अर्धा तास राहू देऊन त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाकावेत. ह्यासाठी खास कलर्ड हेअर साठी जे शॅम्पू मिळतात, त्यांचा वापर करावा.

केसांना ब्राऊन रंग येण्यासाठी पाण्यामध्ये एक चमचा चहा किंवा कॉफी वीस मिनिटे उकळावी. चहा किंवा कॉफी उकळत असलेले हे पाणी, उकळून अर्धे होऊ द्यावे. त्यानंतर हे पाणी गाळून, थंड करून घ्यावे. केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत आणि त्यानंतर हे पाणी केसांवर ओतावे. केसांवर ही शेड चांगली दिसण्याकरिता आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. ह्यातही हलकी लालसर झाक हवी असले, तर चहा किंवा कॉफीसोबत पाण्यामध्ये तीनचार लवंगा उकळून घ्याव्यात.

पांढरे केस रंगविण्यासाठी मेहेन्दीचा वापर आपल्याकडे पूर्वापार चालत आला आहे. मेहंदी केवळ केसांना रंग देते इतकेच नाही, तर केसांना पोषण देऊन त्यांना कंडीशन करते. केसांना लावलेला मेहंदीचा रंग साधारण महिनाभर चांगला राहतो. ह्यासाठी अर्धा कप मेहंदीची पूड अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून घट्टसर पेस्ट तयर करावी. ही पेस्ट केसांना लावावी. दोन तास मेहंदी केसांवर ठेऊन त्यानंतर केस धुवून टाकावेत. मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे केस फक्त पाण्याने धुवावेत. त्यानंतर केसांना भरपूर तेल लावावे, आणि दुसऱ्या दिवशी केस शँम्पूने धुवून टाकवेत.

दोन कप पाण्यामध्ये केशराच्या काही काड्या घालून हे पाणी वीस मिनिटे उकळून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ देऊन केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत व्यवस्थित लाऊन घ्यावे. सर्व केसांवर हे मिश्रण व्यवस्थित पसरेल असे पाहावे. हे मिश्रण केसांवर दोन तास राहू देऊन त्यानंतर केस धुवून टाकावेत. अक्रोडाच्या सालींचा देखील केसांना डाय करण्यासाठी उपयोग केला जातो. अक्रोडाची साले ठेचून घेऊन पाण्यामध्ये उकळावीत. थंड झाल्यावर हे पाणी गळून घ्यावे. आणि केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावे. हे मिश्रण केसांवर तासभर ठेवावे, व त्यानंतर केस धुवून टाकावेत. ह्या मिश्रणामुळे केसांना गडद ब्राऊन रंग येतो.

Leave a Comment