चला अमृतसरला भेट देऊ या


पंजाब राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक म्हणजे अमृतसर. शीख लोकांचे हे प्रमुख धर्मस्थळ आहे. येथे असणारे सुवर्ण मंदिर हे केवळ भारतातील लोकांचे नाही, तर देश विदेशामध्ये वसलेल्या शीख लोकांचे आणि इतर पर्यटकांसाठी देखील आदराचे स्थान आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे अमृतसर हे शहर येथे मिळणाऱ्या अनेक चविष्ट पदार्थांच्या द्वारे पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थान ठरते. त्यामुळे कधी पंजाब मध्ये जाण्याचा मोका आला, तर अमृतसरला भेट देणे अगत्याचे ठरते.

अस्सल पंजाबी खाद्यपदार्थ चाखायचे असतील, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी द्यायच्या असतील, सुंदर फुलकारी दुपट्टे किंवा पंजाबी जुती खरेदी करायची असेल, तर अमृतसरमध्ये हे सर्व काही मिळेल. अमृतसर पर्यंत पोहोचणे अतिशय सोयीस्कर आहे. येथे पोहोचण्यासाठी ट्रेन, विमान दोन्ही उपलब्ध आहेत. येथे पोहोचल्यावर सुवर्ण मंदिराला भेट अवश्य द्यावी. सकाळी लवकर सुवर्ण मंदिरामध्ये गेल्यास गर्दीची वेळ टाळता येते. अतिशय सुंदर, भव्य आणि मनाला अपार शांती देणारे असे हे स्थळ आहे. येथील ‘लंगर’ जगप्रसिद्ध आहे. पोळी, वरण, भात, खीर असे साधेच, पण रुचकर पदार्थ असणारा हा लंगर अवश्य चाखावा.

अमृतसरच्या जवळ गोविंदगड आहे. हा किल्ला पाहण्यासाठी संध्याकाळी चार नंतरची वेळ योग्य आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. किल्ला फिरून पाहिल्यानंतर तुम्ही ह्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. ह्या कार्यक्रमांमध्ये पंजाबी लोकनृत्य म्हणजे भांगडाचे आयोजन केलेले असते. येथील लाईट अँड साऊंड शो देखील अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला खाण्याची आवड असेल, तर ‘केसर दा ढाबा’ ला भेट द्यायलाच हवी. येथे शाकाहारी जेवण मिळत असून, येतील चविष्ट पदार्थांची चव अगदी खूप काळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहील अशी आहे. दाल माखनी, पंजाबी छोले, आणि फिरनी येथील खासियत आहे. अमृतसर येथील अमृतसरी फिश आणि मटन चॉप्स देखील लोकप्रिय आहेत.

पंजाबमधील खास भरतकाम म्हणजे फुलकारी. फुलकारी दुपट्टा येथील स्त्रियांच्या पारंपारिक वेशभूषेचा अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या काळी हे दुपट्टे केवळ सुती असत, पण आताच्या काळामध्ये रेशमी, चंदेरी, शिफॉन ह्या कापडांवरही फुलकारीचे काम पहावयास मिळते. हे हाताचे काम असून एका दुपट्ट्याची किंमत साधारण २५०० रुपयांपासून सुरु होते.

अमृतसर मधील हिरवीगार शेते पुष्कळदा बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये दृष्टीला पडतात. अमृतसरच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये भरपूर हिरवीगार, डोळ्यांचे पारणे फेडणारी शेते आहेत. येथील काही गावांतील शेतांमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर देखील चालविता येईल. तसेच इथे राहून पंजाबमधील ग्रामीण जीवन जवळून पाहण्याची संधी तुम्हाला लाभेल. अमृतसर हून सुमारे दोन तासांच्या अंतरावर वागाह बॉर्डर अआहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना वेगळे करणारी ही बॉर्डर. येथे दररोज सूर्यास्ताच्या वेळी भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांचे सीमा सुरक्षा दलाचे जवान ‘ बिटिंग द रिट्रीट ‘ नामक समारंभामध्ये आपापल्या देशांचे झेंडे सन्मानपूर्वक खाली उतरवितात. सूर्योदय झाला की हे झेंडे पुन्हा वर चढविले जातात. हा सोहोळा अतिशय शिस्तीत पार पाडला जातो. त्यावेळी केले जाणारे जवानांचे संचलन पाहून आणि तेथील एकंदर वातावरण अनुभवून मन देशभक्तीच्या भावनेने भारावून जाते.

Leave a Comment