बेसनाचे त्वचेसाठी फायदे


त्वचेचे सौंदर्य वाढविण्याकरिता बेसनाचा वापर करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. अगदी तान्ह्या बाळापासून ते नव्या नवरीपर्यंत सर्वांच्याच त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी बेसन सहायक आहे. त्वचेवर उन्हामुळे आलेला काळसरपणा, मुरुमे पुटकुळ्या आणि त्वचेवरील मृत पेशी, आणि त्वचेवरील लव हटविण्यासाठी बेसनाचा वापर करण्याची पद्धत आहे. आताशा परदेशामध्ये ही, बेसनामुळे त्वचेला होणारे फायदे लक्षात घेता, बेसनाचा वापर केला जात आहे. बेसनामध्ये प्रथिने, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ज्या व्यक्तींना लो कार्ब डायट ठेवायचे आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये बेसनाचा समवेश करावा.

अॅक्ने हटविण्यासाठी बेसन अतिशय उपयुक्त आहे. अॅक्नेच्या समस्येमध्ये त्वचेतील तैलीय ग्रंथी जास्त सक्रीय झाल्याने चेहऱ्यावर, पाठीवर, मुरुमे येऊ लागतात. मुले वयामध्ये आल्यानंतर ही समस्या उद्भवू लागते. बेसनामध्ये असलेले झिंक अतिरिक्त सीबम उत्पन्न होऊ देत नाही, आणि त्वचेवरील इन्फेक्शन कमी करते. ह्यासाठी एक मोठा चमचा बेसन घेऊन त्यामध्ये हळद घालावी. त्यामध्ये समप्रमाणात लिंबाचा रस आणि मधही घालावे. चेहरा ओलसर करून घेऊन त्यावर हे मिश्रण लावावे. दहा मिनिटे राहू देऊन चेहरा धुवून टाकावा.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामध्ये बाहेर पडावे लागल्याने चेहऱ्यावर किंवा हातापायांवर उन्हाचा राप चढतो, म्हणजेच चेहरा आणि हातपाय काळसर दिसू लागतात. बेसनाच्या वापराने त्वचेवरील राप कमी करता येतो. त्यासाठी चार लहान चमचे बेसनामध्ये एक चिमुट हळद घालावी. त्यामध्ये एक चमचा दही आणि एका लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहऱ्यावर किंवा हातापायांवर लावावे. लिम्बामुळे त्वचेचा काळसरपणा कमी होतो, तर दह्यामुळे त्वचेला आर्द्रता मिळून त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

अनेक व्यक्तींची त्वचा तेलकट असल्याने चेहरा नेहमी तेलकट दिसतो. उन्हाळ्यामध्ये ही समस्या आणखीनच वाढते. त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनामध्ये गुलाब जल घालुन पातळसर पेस्ट करून घ्यावी. हे मिश्रण त्वचेवर लावून वीस मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवून टाकावा. ह्या मिश्रणामुळे त्वचेतील पी एच लेव्हल संतुलित राहतात. तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कामही बेसन करते.

ज्याप्रमाणे बेसन तेलकट त्वचेसाठी चांगले आहे, त्याचप्रमाणे कोरड्या त्वचेसाठी देखील बेसन उत्तम आहे. बेसन आणि दुध किंवा दुधावरील साय यांच्या मिश्रणाने त्वचेला आर्द्रता मिळून त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. ह्या मिश्रणामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाचे तेल घातल्यानेही फायदा होतो. त्वचेवरील मृत पेशी हटवून त्वचा चमकदार बनविण्यासाठी देखील बेसन उपयुक्त आहे. मृत पेशींमुळे त्वचेवरील रंध्रे मोकळी होत नाहीत. आणि त्यामुळे त्वचेवर ब्लॅक हेड्स, अॅक्ने अश्या समस्या उद्भवू लागतात. अश्या वेळी बेसनाचा वापर स्क्रब म्हणून करून त्वचेवरील मृत पेशी हटविता येतात. ह्या साठी तीन चमचे बेसनामध्ये एक चमचा ओट्स घालून, त्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोर आणि आवश्यकतेप्रमाणे दुध घालावे. हे मिश्रण हळुवार हाताने चोळत त्वचेवर लावावे. दहा मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर राहू देऊन त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही