हायपर अॅक्टीव्ह मुलांवर नियंत्रण कसे ठेवता येईल?


हायपर अॅक्टीव्ह , म्हणजेच अत्यधिक प्रमाणामध्ये सक्रीय असणारी मुले घरामध्ये असणे, ही घरातील सर्वच मोठ्या माणसांच्या धावपळीचा आणि सहनशक्तीचा कस लागेल अशी बाब आहे. ही मुले अतिशय चंचल म्हणता येतील. ह्याचे मन एका गोष्टीवर फार काळ स्थिर राहू शकत नाही. तसेच ही मुले एका ठिकाणी फार वेळ बसू शकत नाहीत. त्यांना सतत काहीतरी नवीन लागते. अशी मुले नेहमी काहीतरी उचापती करून घरच्या मंडळींच्या नाकी नऊ आणत असतात. या मुलांना एकटे, देखरेखीच्या विना सोडूनही चालत नाही. कुठल्या क्षणी ह्यांच्या मनामध्ये कोणती कल्पना येईल याचा नेमका अंदाज घेणे कठीण असते.

अश्या अति सक्रीय मुलांचे लक्ष एका गोष्टीवर केंद्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील उर्जेला व्यवस्थित चालना देण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. अश्या मुलांना खेळांमध्ये किंवा कामांमध्ये गुंतवावे, ज्यामध्ये त्यांची शारीरिक उर्जा खर्च होईल. नृत्य, निरनिराळे खेळ, ह्यामुळे ह्यांच्या शरीराला आवश्यक व्यायामही मिळतो आणि शरीराची उर्जा योग्य ठिकाणी खर्च होते. तसेच ह्या मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना बोर्ड गेम्स, कोडी सोडविणे अश्या प्रकारचे बौद्धिक व्यायाम आवश्यक आहेत.

अति सक्रीय मुलांचे मन शांत करण्यासाठी मधुर, संथ संगीतचा उपयोग करण्याचा सल्ला मनोवैज्ञानिक देतात. तसेच टीव्ही, प्ले स्टेशन, व्हिडियो गेम्स, मोबाईल ह्यांचा वापर मर्यादित ठेवायला हवा. ह्या साधनांच्या अतिवापराने मुलांचे मन आणखी सक्रीय होत असते. तसेच ह्या साधनांमधील मोठे, कर्कश आवाज, भडक रंग ह्यांचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचे मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

अति सक्रीय मुलांमध्ये गोड पदार्थांचे किंवा साखरेच्या सेवनाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. ह्या मुलांच्या खानपानाच्या सवयींवर लक्ष असणे अतिशय महत्वाचे आहे. खानपानाचा सरळ संबंध मेंदूशी असतो. साखरेच्या अतिसेवनाने मेंदूमधील गतीविधी आणखीनच जलद होऊ लागतात. परिणामी मुले जास्त सक्रीय होतात. त्याचप्रमाणे शीतपेये, जंक फूड, ह्याच्या सेवनावर नियंत्रण असणे ही आवश्यक आहे.

अति सक्रिय मुलांचे मन मालिशमुळे लवकर शांत होते. आईचा मुलायम स्पर्श आणि मधुर आवाजातील बातचीत मुलांच्या शरीरातील एंडोर्फीन्सना चालना देणारी आहे. त्यामुळे ह्या मुलांची नियमित मालिश त्यांच्यासाठी मानसिक स्वास्थ्य देणारा उत्तम उपचार आहे.

Leave a Comment