टपाल कार्यालयातील खातेधारकांना मिळणार डिजिटल बँकिंग सेवा


देशातील टपाल कार्यालयांमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तींना पुढील महिन्यापासून डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. सरकारने अशा खात्यांना भारतीय टपाल पेमेंट बँकेशी (आयपीपीबी) जोडण्याची परवानगी दिली आहे.

टपाल खात्यांमध्ये सध्या 34 कोटी खातेधारक आहेत. यातील 17 कोटी बचत खाते आणि अन्य खाती मासिक प्राप्ती योजना, आवर्ती जमा खाती इ. आहेत. त्यांना आता या डिजिटल सेवांचा पूर्णपणे लाभ घेता येणार आहे.

‘‘अर्थ मंत्रालयाने टपाल कार्यालयातील बचत बँक खात्यांना आयपीपीबी खात्यांशी जोडण्याची परवानगी दिली आहे. यामुळे टपाल कार्यालयांमध्ये बचत खाता असलेल्या व्यक्ती आपल्या खात्यातून अन्य बँकांच्या खात्यांमध्ये पैसे पाठवू शकतील,” असे सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

सरकारच्या या पावलामुळे देशातील सर्वात मोठे बँकिंग जाळे निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, कारण भारतीय टपाल खात्याच्या सर्व 1.55 लाख टपाल कार्यालय शाखांना आयपीपीबीशी जोडण्याची योजना आहे.

टपाल खात्याने कोर बँकिंग सेवा यापूर्वीच सुरू केली आहे, परंतु ती केवळ टपाल कार्यालयांतील बचत बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्याची सोय पुरवते.

‘‘ आयपीपीबीचे संचालन रिझर्व्ह बँक करते, तर टपालातील बचत बँकिंग सेवा अर्थ मंत्रालयाच्या अधीन असते. आयपीपीबी ग्राहक बँक ग्राहकांसाठी असलेल्या एनईएफटी, आरटीजीएस तसेच पैसे पाठवण्याच्या सेवांचा वापर करू शकतात. ही सेवा वैकल्पिक असून टपाल खातेधारकांनी हा पर्याय निवडला तरच त्यांच्या खात्यांना आयपीपीबी खात्यांशी जोडण्यात येईल,” असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment