आता अंतराळातही एन्जॉय कराल हॉलिडेज!


नवी दिल्ली – येत्या चार वर्षात चक्क अवकाशात सुट्टी घालवता येणे शक्य होणार असून अंतराळातील पहिले लक्झरी हॉटेल अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील ओरिअन स्पॅन या स्टार्टअपतर्फे बनविण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील स्पेस २ संमेलनात ओरियन स्पॅनचे सीईओ व संस्थापक फ्रॅक बेंगर यांनी केली आहे.

हे हॉटेल २०२२ पर्यंत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत बनविण्यात येणार असल्याचे बेंगर यांनी सांगितले. या हॉटेलचे नाव ‘ऑरोरा स्टेशन’ असे आहे. पृथ्वीपासून ३२१ किलोमीटर उंचीवर असलेल्या या हॉटेलमध्ये खोली आरक्षित करण्यासाठी ८० हजार डॉलर मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर तब्बल ६१.१ कोटी रुपये १२ दिवसांच्या आकर्षक हॉलिडे पॅकेजसाठी मोजावे लागणार आहेत. ‘ऑरोरा स्टेशन’ अंतराळात येत्या २०२१ पर्यंत लॉन्च करण्याचा ‘ओरियन स्पॅन’चा मानस असून त्यानंतर लगेचच २०२२ मध्ये पर्यटकांना या हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव घेता येणार असल्याचे फ्रॅक बेंगर यांनी सांगितले आहे.

पर्यटकांना अंतराळातील विविध घडामोडी ‘ऑरोरा स्टेशन’च्या माध्यमातून अगदी जवळून अनुभवता येणार आहे. पर्यटकांना ‘ऑरोरा स्टेशन’मध्ये शुन्य गुरुत्वाकर्षण, अंतराळातील ग्रहांच्या आश्चर्यकारक हालचाली, सुर्योदय आणि सुर्यास्ताचे मनोहारी दृश्य यांचा अनुभव ‘याची देही याची डोळा’ घेता येणार आहे.

Leave a Comment