उन्हाळ्यामध्ये ह्या कापडांपासून बनविलेले कपडे वापरणे श्रेयस्कर


उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. अश्या वेळी उकाड्यापासून आणि घामापासून बचाव करण्यासाठी सर्वजण अंगावर हलके, हवेशीर कपडे घालणे पसंत करतात. हलक्या कपड्यांमध्ये सर्वसाधारणपणे सुती कपडे हा सर्वोत्तम पर्याय असला, तरी त्यामध्ये मनासारखे रंग किंवा डिझाईन न मिळाल्याने नाईलाजास्तव अन्य प्रकारच्या कापडापासून तयार केलेले कपडे निवडले जातात. अश्या ह्या कपड्यांमुळे उकडते, शिवाय शरीरावाटे बाहेर पडणारा घाम देखील अवशोषित कपड्यांद्वारे होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेला सतत खाज सुटणे, घामोळी येणे, किंवा बारीक पुरळ होणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे अश्या काही कापडांपासून बनलेले कपडे वापरणे इष्ट, ज्यांच्यामुळे त्वचेला ताजी हवा मिळत राहील, आणि कपडे आरामदायक असतील.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात थंड राहणारे फॅब्रिक म्हणजे लिनेन. हा कपडा घाम शोषून घेऊन त्वचेला थंडावा देणारा आहे. पण ह्या फॅब्रिक वर सुरकुत्या अतिशय लवकर पडत असल्याने हा कपडा मेंटेन करण्यास काहीसा कठीण आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या कपड्याचा वापर करून तयार केले गेलेले शर्टस, कुर्ते, साड्या इत्यादींचा वापर करता येईल. त्याचप्रमाणे शॉम्ब्रे नामक फॅब्रिक ही उन्हाळ्यामध्ये वापरण्यास चांगले आहे. हा कपडा अंगावर उठून दिसतो, व शरीराला थंडावा ही देतो. हा कपडा जितका जास्त धुतला जाईल, तितका तो मऊ पडत जातो. हा कपडा अंगावर बाळगण्यास अतिशय हलका असून, शरीरासाठी एसी प्रमाणे काम करणारा आहे.

शिफॉन प्रमाणेच दिसणारा जोर्जेट का कपडा देखील उन्हाळ्यामध्ये वापरण्यास चांगला आहे. विशेषकरून महिलांसाठी हा कपडा चांगला आहे. हा कपडा वजनाला फारसा भारी नसून, धुतल्यानंतर लगेचच स्वछ होणारा आहे. अनेक सुंदर रंगांमध्ये आणि डिझाइन्समध्ये हा कपडा बाजारामध्ये उपलब्ध आहे. तसेच रेयॉन हा कपडा सुती, रेशमी, लिनेन आणि काही प्रमाणांत वुलन धाग्यांचे मिश्रण असणारा कपडा आहे. स्वस्त, टिकाऊ आणि रेशमासारखा दिसणारा म्हणून हा कपडा वापरात आला. हा कपडा दिसायला काहीसा जाडसर असला, तरी त्वचेला थंडावा देणारा आहे. म्हणून हा कपडा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वापरण्यास श्रेयस्कर आहे.

खादी हा कपडा उन्हाळा आणि थंडी ह्या दोन्ही ऋतुंमध्ये वापरण्यासाठी चांगला आहे. थंडीमध्ये हा कपडा शरीराला ऊब देतो, तर उन्हाळ्यामध्ये हाच कपडा शरीराला थंडावा देऊन घाम अवशोषित करतो. आधी खादीचा वापर मर्यादित प्रमाणात केला जात असे. पण आता खादीचा वापर लोकप्रिय होत असून भारताप्रमाणेच परदेशातही ह्या कपड्याला मोठी मागणी आहे. आजच्या काळामध्ये खादी अनेक सुंदर रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment