वजन घटविण्यासाठी आता ‘स्नेक डायट’ ची क्रेझ


वजन घटविण्यासाठी खात्रीशीर उपाय म्हणजे डायट. आजकाल पॅलियो, कीटो, रॉ फूड डायट, अल्कलाईन डायट अश्या निरनिराळ्या डायटच्या प्रकारांचा अवलंब होताना पाहायला मिळतो. ह्या यादीमध्ये आता ‘ स्नेक डायट ‘ नामक नवीन डायटहच्या प्रकाराची भर पडली आहे. आल्बर्टा येथील कोल रॉबिन्सन यांच्या कल्पनेतून ह्या डायटचा जन्म झाला आहे. ह्या डायटच्या तीन पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीमध्ये ४८ तासांचा उपवास करावयाचा असून, शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडावेत या करिता पाण्यातून अॅपल सायडर व्हिनेगर आणि क्षार युक्त द्रव पदार्थांचेच सेवन फक्त करायचे आहे.

दुसऱ्या पायरीमध्ये देखील उपवास करायचा आहे, पण हे शेड्युल सेकंदाबरहुकुम नाही पाळले तरी चालते. तिसऱ्या आणि अखेरच्या पायरीमध्ये भूक आणि तहानेच्या बाबतीत तुमचे शरीर तुम्हाला देत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे, म्हणजेच भूक लागली आहे असा सिग्नल तुमच्या शरीराने दिल्यानंतरच माफक आहार तुम्हाला घ्यायचा आहे. अश्या प्रकारे हे डायट पाळल्यास खात्रीशीर वजन उतरेल असा दावा रॉबिन्सन यांनी केला आहे.

रॉबिन्सन यंच्या मते, अनेकदा आहारतज्ञ किंवा फिटनेस ट्रेनर, आपल्या शरीरामध्ये अन्नाचे चयापचय कसे होते, व त्याचे रुपांतर ऊर्जेमध्ये कसे होते हे समजून न घेताच आपल्या क्लायंट ना डायट सुचवीत असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच स्नेक डायटची कल्पना अस्तित्वात आली असल्याने, ह्या डायटचा वजन घटविण्यास आणि घटलेले वजन कायम ठेवण्यास उपयोग होईल असा विश्वास रॉबिन्सन यांना वाटतो. तसेच हे डायट पाळल्यामुळे टाईप २ डायबेटीस, हर्पीस च्या रुग्णांना लाभ होईल असे म्हटले जात आहे.

जास्तीत जास्त काळाकरिता उपवास केला जावा या संकल्पनेवर हे डायट आधारित आहे. म्हणजेच शरीराच्या पोषणाला आवश्यक तो सर्व आहार एकाच जेवणामध्ये खाल्ला जावा आणि दिवसाच्या बाकी वेळी उपवास केला जावा. कर्बोदकांच्या मानाने या डायटमध्ये फॅट्सचे प्रमाण अधिक आहे. आता असे हे डायट सर्वार्थाने सुरक्षित आहे किंवा नाही, हा चर्चेचा विषय असू शकतो. आहारतज्ञांच्या मते दिवसातून एकच वेळ जेवून बाकीचा संपूर्ण वेळ उपाशी राहण्याने शरीर हलके होत असले, तर हा उपाय कायमस्वरूपी स्वीकारण्यास योग्य नाही. शरीराच्या चयापचायावर अश्या डायटचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे आहारतज्ञांचे मत आहे. ज्याप्रमाणे साप आपले अन्न खाल्ल्यानंतर ते पूर्ण पचेपर्यंत संपूर्ण उपवास करतो, त्याच संकल्पनेवर हे डायट आधारित असल्याने ह्या डायटला स्नेक डायट असे नाव दिले गेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment