‘आरबीआय’कडून रेपो रेट ‘जैसे थे’


मुंबई: आज भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रेपो रेट ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ६ टक्‍क्‍यांवर रेपो रेट कायम ठेवण्यात आला असून ५.७५ टक्क्यांवर रिव्हर्स रेपो रेट देखील कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण (सीआरआर) ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. आरबीआयने यावेळी बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षातील हा पहिलाच द्वैमासिक पतधोरण आढावा आहे.

कालपासून रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीची दोन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमीच होती. उद्योग क्षेत्र आणि शेअर बाजाराचे या बैठकीकडे आधीपासूनच लक्ष लागले होते. गेल्या आढावा बैठकीत व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आढावा बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५टक्के कपात करून तो ६ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला होता. हा मागील सहा वर्षांतील नीचांकी रेट ठरला होता. बॅंकर आणि तज्ज्ञ यांनी आधीपासूनच आरबीआयकडून रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली होती.

Leave a Comment