मुलांच्या संभाषणकलेला वाव देणे आवश्यक


आयुष्यामध्ये अनेक प्रसंगांमधून आपले संभाषण चातुर्य आपल्याला तारून नेत असते. महत्वाच्या प्रसंगी तुम्ही तुमचा मुद्दा कसा मांडता ह्यावरून तुमच्याबद्द्लाचे मत ठरत असते. म्हणूनच अगदी लहानपणापासूनच मुलांच्या संभाषण कलेला वाव मिळणे अगत्याचे आहे. संभाषण कला उत्तम अवगत असेल, तर इतरांशी संवाद साधणे, आणि त्यांच्या बरोबर काम करणे सहज शक्य होते. आपल्या मुलांमध्ये संभाषण चातुर्य विकसित करण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील असायला हवे.

आपली मुले आपल्याकडे फार बारकाईने पाहात असतात. पालकांच्या उठण्या-बसण्याच्या आणि इतर दैनंदिन सवयींप्रमाणेच कसे बोलावे ह्याचे निरीक्षण मुले करीत असतात, आणि कळत नकळत ह्या सवयी आत्मसात करीत असतात. त्यामुळे मुलांसमोर बोलताना भाषा कशी असावी, हावभाव कसे असावेत ह्याबद्दल दक्ष असावे. विशेषतः मुले कळती झाल्यानंतर, ती पालकांकडे त्यांचे ‘रोल मॉडेल’ किंवा आदर्श म्हणून पहात असतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी बोलत असताना साधी आणि सोपी भाषा आणि सकारात्मक बॉडी लँग्वेज असेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

मुलांशी संभाषण करीत असताना जर मुले अडखळली, किंवा त्यांचा काही वेळाकरिता गोंधळ उडाला, किंवा आपले विचार मांडायला त्यांना योग्य शब्द सापडत नसतील, तर मुलांना टोकू नये. त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घेऊन त्यांची मते योग्य शब्दांमध्ये मांडण्यास मदत करावी. जर मुले बोलत असताना तुम्ही अधे मध्ये थांबवून त्यांच्या चुका काढत राहिलात, तर अश्याने मुलांचा आत्मविश्वास डळमळू लागतो. त्यामुळे मुलांचे बोलणे संपेपर्यंत थांबावे आणि मग त्यांच्या चुका त्यांना दाखवून देऊन त्या कश्या सुदाराव्यात या संदर्भात मार्गदर्शन करावे.

भाषाज्ञान सुधारण्याचे उत्तम साधन म्हणजे वाचन. अनेक पुस्तके सुंदर, अस्खलित भाषेचे उदाहरण आहेत. अशी पुस्तके वाचण्यास मुलांना प्रोत्साहन द्यावे. जे पुस्तक मुलांच्या वाचनात असेल त्यावर मुलांशी चर्चा करा. त्याने मुलांचा वाचनातील रस आणखी वाढेल, व त्यांनी वाचलेले नवनवे शब्द व त्यांचे अर्थ त्यांच्या अधिक उत्तम प्रकारे लक्षात राहतील. तसेच आजकाल बाजारामध्ये भाषा सुधारण्यासाठी अनेक सीडी मिळतात. मुलांनी त्या लक्षपूर्वक ऐकल्या तर त्यांची भाषा आणि संभाषण कला सुधारण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.

Leave a Comment