सहारा वाळवंटाच्या क्षेत्रफळात १० टक्क्यांची वाढ


न्यूयार्क – जगातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून सहारा वाळवंट ओळखले जाते. या वाळवंटाने उत्तर आफ्रिकेचा जवळजवळ सर्वच भाग व्यापलेला आहे. सहारा वाळवंटाच्या क्षेत्रफळात १९२०पासून ते आजपर्यंत जमिनीच्या वाढत्या तापमानामुळे १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे एका भारतीय वंशाच्या संशोधकाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे इतर वाळवंटाच्या क्षेत्रफळातदेखील वाढ झालेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती देताना अमेरिकेच्या मॅरीलँड विद्यापीठातील पर्यावरण आणि महासागर वैज्ञानिक सुमंत निगम म्हणाले, केवळ सहारा वाळवंटासंदर्भात माहिती आमच्या अहवालातून देण्यात देण्यात आलेली आहे. पण जगभरातील अन्य वाळवंटाचादेखील अंदाज यावरुन बांधला जाऊ शकतो.

वाळवंटात वार्षिक पर्जन्यमान फारच कमी असते. दरवर्षी येथे सर्वसामान्यपणे १०० मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो. आफ्रिकेत १९२० ते २०१३पर्यंत पर्जन्यमानाच्या आकड्याचा संशोधकांनी अभ्यास केला. या कालावधीत खंडाच्या उत्तर भागात पसरलेल्या सहारा वाळवंटाच्या क्षेत्रफळात १० टक्के वाढ झाली आहे. काही भागात हा विस्तार ९३ वर्षात १६ टक्क्यांपर्यंत पाहायला मिळत आहे.

वाळवंटाच्या क्षेत्रफळात मानवी आणि नैसर्गिक बदलांमुळे वाढ झाली असल्याचा दावा या अहवालात करण्यात आलेला आहे. याचा परिणाम आफ्रिकेतील देशात पाहायला मिळत आहे. तेथील कृषी अर्थकारण संकटात आहे. तर तापमानात वाढ होत असून, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

Leave a Comment